राधे राधे, हे बोल कानावर पडले की मनाला आठवते, पुराणात राधेकृष्णाचे मानवरूपी वास्तव्य असलेली वृंदावननगरी. याच नगरीत आज देशविदेशातून लोक बघायला येतात ते राधाकृष्णाचे प्रेमाचे प्रतीक असलेले अप्रतिम असे ‘प्रेम मंदिर’.
प्रेमाचं प्रतीक असलेला आग्र्रा येथील ताजमहल आहे तसेच हे भगवंत प्रेमाचे प्रतीक असलेले प्रेम मंदिराचे दर्शन मानवी मनाला निःस्वार्थ भावातल्या प्रेमाची महती तथा भक्ती शिकवून जाते. मंदिराची रचना भव्य सुंदर असून, संगमरवरमध्ये बांधकाम अप्रतिम आहे.संध्याकाळच्या वेळी सतत कलर बदलणारी अलोभनीय लखलखणारी लायटिंग मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर टाकते. मंदिराच्या भोवताली विविध प्रकारची फुलांच्या रंगांनी बहरलेले रंगीबेरंगी फुलांचे गार्डन डोळ्याचे पारणे फेडतात.
अनेक कृष्णलिलांचे स्टँचूंचे देखावे भगवंताच्या लिलांचे दर्शन घडवतात.राधाराणीची कृष्णासह गोपिकांसह रंगलेली रासलिला दर्शन मनाला सुखावते.
गोवर्धन पर्वत भगवंताने करंगळीवर धरलेला देखावा मनाला गोकुळनगरीत पोहोचवतोच. तर त्यासोबतच पर्वताखाली आसर्याला अनेक गय्या, मैय्या, गोपिकाचा देखावा भगवंताच्या सहवासाच्या अनुभवाचे क्षण जगण्याचा भास दर्शवतात.
असे म्हणतात यात्रा, जत्रा अनुभवताना हृदयातून आत्मिक भक्तिभाव घेऊन जावे.तरच भगवंत भेटेल; अन्यथा आजकाल जिकडे -तिकडेच देवस्थान पुण्यनगरीत गल्लीबोळात अस्वच्छता बघायला भेटते व देवदर्शनाला पास मिळवतात.
पण आत्मिक भाव ठेवला तर मानवरूपात असो वा प्राणिमात्रात मदतीच्या रूपात भगवंत भेटेल.
जिथे साक्षात राधाकृष्ण वावरले त्या मातीवर अनवाणी चालताना मनात येणारी भावभक्ती, त्या प्रेमनगरीत प्रेम मंदिरातली राधाराणी कृष्णासह विराजमान बघून प्रेमीयुगुलांनाही भावनिक होत डोळ्यातून बरसणार्या अश्रुधारा वेगळ्याच जगात घेऊन जातात हेही वास्तवच.
निधीवनातली कथा सांगते की, तिथे रात्री गोपिकांची रासलिला होते व सकाळी गोपिकांची झाडे बनतात. तिथले रमणीय वातावरण, आपली भावनिक भक्तीतून भगवंत राधाराणीच्या जगात हरवत नेतात जणू भूलभुलैयाचा अनुभव देणारी लिला,
मनःशांतीची अनुभूती करून देतात.
मथुरेत कंसमामाचा महल, कृष्णजन्म झालेला कारागृह स्थळ. तिथे अनावर होणार्या कृष्णजन्म कथेच्या भावना. वासुदेव, देवकीचे कारागृहातील स्थळकथा. तिथे कृष्णजन्मासाठी भगवंताचा आठवणारा संघर्ष मनाला भूतकाळात घेऊन जातो.
वृंदावन गाव सादेसरळच, प्रेमळ नागरिक, अरुंद गल्लीबोळातून जाणारा रस्ता, वाहणार्या सांडपाण्याच्या नाल्या, माकडांचा छेडछाडीचा होणरा त्रास मनाची चिडचिड करून जातो.गावाचा हवा तेवढा विकास झालेला नाही दिसत. पण अंतर्मनात भाव तिथे देव ही श्रद्धा ठेवली तर भगवंत भेटतोच हा अनेकांचा अनुभव आहे. म्हणून एकदातरी वृंदावन अनुभवावेच. पण पूर्ण श्रद्धा भाव ठेवूनच. तरच तिथली किमया समजते. राधाकृष्ण भक्तिरसाचा आनंद भेटतो.