आता कारवाईची वेळ!
शहरात दुचाकी, चारचाकी वाहनचोरी, घरफोडीसह भरदिवसा चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील महिन्यात नाशिक आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारलेले जयंत नाईकनवरे यांना आता खर्या अर्थाने रस्त्यावर उतरून पोलिसिंग करण्याची गरज आहे.
शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना एखादा गंभीर गुन्हा घडण्यापूर्वी व घडल्यानंतर काय करावे, याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाते. त्यानुसार काही पोलीस कारवाई करतात. त्या तुलनेत शहरातील 12 पोलीस ठाण्यांचा आढावा घेतला असता, नागरिक तथा पीडित महिलांनी एखादा गुन्हा होण्यापूर्वीच तक्रार दिलेली असते. मात्र, पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने सुरक्षितता धोक्यात येत असल्याचे दिसून आले. हाणामारी, लूटमार, हुंडाबळीसह इतर गंभीर गुन्हे घडल्यानंतर अनेकदा पोलीस आर्थिक लाभापोटी आरोपीशी हातमिळवणी करत असल्याचे गेल्या काही दिवसांतील लाच प्रकरणांवरून दिसून आले आहे. परिणामी, शहरात पोलीस दलाची प्रतिमा खालावत आहे. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसह गुन्ह्याची उकल वेगाने केली तर शहरात रक्तपात वाढणार नाही. तरुणाई भाईगिरीकडे वळणार नाही. क्षुल्लक व किरकोळ कारणांनी खुनाच्या घटनांनी शहर हादरत आहे. चेन स्नॅचिंग, घरफोडी, खून, सोनसाखळी, वाहनचोरी आदी गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्मार्ट पोलिसिंग करणार्या पोलिसांनी यात सुधारणा केली नाही तर शहरात आणखी रक्तपात वाढून गुन्हेगारी डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. चोरट्यांनी लग्नसोहळ्यात येणार्या महिलांना लक्ष्य केल्याच्याही अनेक घटना घडत आहेत. या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याची चर्चा आहे. पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी नागरिकांना थेट भेट घेण्यासाठी आपले दालन सोमवारी ते शुक्रवार सायंकाळी 4 ते 5 पर्यंत खुले केले आहे. त्यामुळे नागरिक थेट आयुक्तांशी संवाद साधत असले तरी पोलीस आयुक्तांनी नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करण्याची गरज आहे. पोलिसांची नाकाबंदी, गस्त, पेट्रोलिंग तसेच कोम्ंिबग, तडीपारीच्या कारवाईची गरज आहे.
अमोल सोनवणे