हेरवाडचे धाडसी पाऊल!

महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. देशातील अनेक क्रांतिकारी बदलांची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. स्वातंत्र्यपूर्व असो वा स्वातंत्र्यानंतर अनेक सकारात्मक बदलाचे जनक महाराष्ट्रातील समाजसेवक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धोंडू केशव कर्वे, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले या थोर समाजसेवक विचारवंतांनी अनेक अनिष्ट प्रथांवर आपल्या लेखणीतून आणि कार्यातून कठोर घाव घालत त्या प्रथा समाजातून नष्ट केल्या. बालविवाह, केशवपन, सती प्रथा या सगळ्या प्रथा बंद होण्यास अनेक समाजसेवकांनी आपले आयुष्य खर्ची घातले. महिलांना शिक्षण मिळावे यासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांनी कार्य केले. तर विधवा पुनर्विवाहासाठी धोंडो केशव कर्वे यांनी कार्य करत सकारात्मक बदल घडवला. अशा थोर समाजसेवक फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आजच्या काळात एका नवीन सकारात्मक बदलाचे बीज रुजू लागले आहे.
समाजात अनेक घडामोडी, घटना रोज घडत असतात. काही घटना निश्‍चितच समाजाला दिशा देणार्‍या असतात. तर काही सकारात्मक घटना समाजाला दिशाच देत नाहीत, तर समाजमन बदलण्यास सुरुवात करतात. अशी एक स्वागतार्ह घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावात घडली. हेरवाड या ग्रामपंचायतीने सर्वसंमत्तीने एक धाडसी ठराव पास केला. त्या निर्णयाने समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. 21 व्या शतकातही वैधव्य प्राप्त झाल्यानंतर मानसिक खच्चीकरण करत त्यांच्याकडून स्त्री म्हणून आभूषणे घालण्याचा, कुंकू लावण्याचा अधिकार हिरावला जातो. हीच बाब लक्षात घेत हेरवाड ग्रामपंचायतीने याच अनिष्ट प्रथेविरुद्ध ठराव संमत केला. पतीच्या निधनानंतर बांगड्या फोडणे, जोडवे, मंगळसूत्र काढण्यात येतात. या प्रथेविरुद्ध ठराव पास करून हेरवाड ग्रामपंचायतीने समाजापुढे नवीन आदर्श निर्माण केला. हेरवाडच्या प्रबोधनकारी निर्णयाची दखल राज्य शासनाने घेतली आहे. राज्य शासनाने राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी असा ठराव संमत करावा, असे परिपत्रक काढत हेरवाड पॅटर्न राज्यभरात राबविण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. हेरवाडसारखा प्रबोधनकारी निर्णय होण्यास 2022 साल उजाडावे लागले हे पुरोगामी महाराष्ट्राला विचार करायला लावणारे आहे. मात्र, देर आये दुरुस्त आये या उक्तीप्रमाणे समाजातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. अनेक विधवा महिलांनी या निर्णयाचा स्वीकार करत परत मंगळसूत्र, जोडवे, बांगड्या ही आभूषणे घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे समाजाची वाटचाल पुरोगामी विचाराने खर्‍या अर्थाने होत आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.
भारतीय समाजात रूढी, परंपरा यांना अद्वितीय महत्त्व आहे. परंपरा जपण्यात भारतीय समाज अग्रेसर आहे. त्यामुळे काही अनिष्ट प्रथा 21 व्या शतकातही समाजासाठी त्रासदायक ठरतात. तरीही त्या परंपरा असल्याने त्याविरुद्ध चक्कार शब्द न काढता मुकाट्याने त्या परंपरांचे पालन करण्यात येते. वर्षानुवर्षे समाजमनावर बिंबवलेल्या अनिष्ट प्रथा मोडीत काढण्याचे कोणीही धाडस करत नाही. आणि त्यातूनच अनिष्ट रूढी, परंपरा खोलवर रुजलेल्या आहेत. त्या अनिष्ट प्रथांचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. विशेष करून महिलावर्गाकडूनच महिलांचे अनिष्ट प्रथा पाळण्यासाठी मानसिक खच्चीकरण करण्यात येते. सध्याचे तंत्रज्ञानाचे युग आहे. काळ बदलला आहे. तरी समाजात विधवा महिलांना अद्यापही मानाचे स्थान मिळत नाही.
पतीच्या निधनानंतर कुंकू लावणे, जोडवे घालणे, मंगळसूत्र घालणे, बांगड्या घालणे चुकीचे मानले जाते किंवा धार्मिक आणि कौटुंबिक कार्यक्रमात विधवा असल्याने वेगळी वागणूक देण्यात येते. तिच्या वाटेला येणारे वैधव्य हे अनपेक्षितपणे आलेले असते. तरी पतीच्या निधनानंतर अनेक महिलांना त्यांच्या इच्छेने वैधव्य आल्यासारखा त्रास त्यांना देण्यात येतो. विशेष करून ज्या महिला कामाच्या निमित्ताने बाहेर पडतात, त्यांना सरकारी अथवा खासगी कार्यालयात विधवा असल्याने वेगळी वागणूक दिली जात नाही. मात्र, कुटुंबात रुजलेल्या प्रथांमुळे दुय्यम वागणूक त्यांना देण्यात येते. त्यामुळे घरात होणार्‍या मानसिक खच्चीकरणामुळे विधवा महिलांना आत्मसन्मानाने जगताही येत नाही. मात्र, हेरवाडसारख्या निर्णयाने अशा प्रथांना आळा बसून विधवा महिलांना आत्मसन्मानाने जगता येईल, हे मात्र नक्की.

अश्‍विनी पांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *