सीसीटीव्हीद्वारे वाहतूक पोलिसांचा वॉच; कारवाई होणार
नाशिक ः प्रतिनिधी
शहरातील 40 वाहतूक सिग्नलवरील सीसीटीव्ही आज(दि.20)पासून कार्यान्वित होत आहेत. यामुळे वाहतुकीचे नियम तोडणारे, बेशिस्त वाहनधारक सीसीटीव्हीमध्ये कैद होणार असून, त्यांना ई-चलनाद्वारे दंड आकारला जाणार आहे. दंडाचा मेसेज थेट मोबाइलवर येणार आहे.
सिग्नल तोडणे, यूटर्न, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी नेणे, ट्रिपल सीट आदी नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन करावेच लागणार आहे. अन्यथा सीसीटीव्हीच्या तिसर्या डोळ्याची नजर वाहनधारकांवर राहणार आहे.
शहरात सीसीटीव्ही बसविले आहेत. अद्याप ते सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले नव्हते.पोलिस आयुक्तालयाकडून यासंदर्भात स्मार्टसिटीकडे पाठपुरावा करण्यात येत होता. आगामी काळात कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सीसीटीव्हीचा उपयोग करण्यात येणार आहे. वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतरही योग्य दृश्यमानता नसल्याने चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही बसविण्यात आले.
नव्याने बसविण्यात आलेले सीसीटीव्ही आजपासून कार्यान्वित होत आहेत. याची जोडणी पोलीस नियंत्रण कक्षात देण्यात आली आहे. पोलीस नियंत्रण कक्षात एलसीडी वॉल उभारली असून, यावर बेशिस्त वाहनधारकांवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. यासाठी वाहतूक शाखेतील अंमलदारांना सीसीटीव्हीच्या आधारे कायदेशीर कारवाई, बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईसह इ-चलनचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.त्यामुळे आजपासून टप्प्याटप्प्याने बेशिस्तांवर ई-चलनअंतर्गत कारवाई होणार आहे. नियम मोडल्यास सीसीटीव्हीद्वारे त्याची माहिती पोलिसांच्या सीसीसीमध्ये ई-स्वरूपात येईल. त्याची पडताळणी करून ई-चलनाद्वारे दंड आकारला जाईल.
या सिग्नलवरील सीसीटीव्ही कार्यान्वित
सरकारवाडा पोलीस स्टेशन, सीबीएस, मेहेर सिग्नल, जुना गंगापूर नाका, शरणपूर चौकी, तरणतलाव, सांगली बँक, त्र्यंबक नाका, कॅनडा कॉर्नर, गंगापूर पोलीस स्टेशन, एबीबी सर्कल, सिबल हॉटेल, जेहान सर्कल, सिटी सेंटर मॉल, बारदान फाटा, पाइपलाइन रोड, प्रसाद सर्कल, विद्या विकास सर्कल, भद्रकाली पोलीस स्टेशन, खडकाळी, मुंबई नाका पोलीस स्टेशन, गडकरी चौक, नागजी चौक, मुंबई नाका सर्कल, पंचवटी पोलीस स्टेशन, पेठ नाका, काट्या मारूती चौक, सेवाकुंज, मखमलाबाद नाका, ड्रीम कॅसल नाका, तारवाला चौफुली, नवीन मार्केट चौक, म्हसरूळ पोलिस स्टेशन, मेरी चौफुली, राऊ हॉटेल, आडगाव पोलिस स्टेशन, नांदूर नाका, मिरची चौक, सातपूर पोलिस स्टेशन, आयटीआय चौक, पपया नर्सरी, समृद्धी टी पॉइंट, महिंद्रा सर्कल, अंबड पोलिस स्टेशन, त्रिमूर्ती चौक, नाशिकरोड पोलिस स्टेशन, विहितगाव टी पॉइंट, बिटको चौक, उपनगर पोलिस स्टेशन, दत्तमंदिर.
अशी आहे तयारी
♦ पोलीस नियंत्रण कक्षात 6 बाय 4 फुटांची एलसीडी वॉल
♦ 16 डबल पॅनलचे मॅानिटरचा समावेश
♦ गुगल मॅपद्वारे सिग्नल्स व वाहतूक कोंडीची मिळणार सूचना
♦ नियंत्रण कक्षातून मिळणार सिग्नलवर सूचना
♦ सिग्नल मोडणारे, झेब्रा कॉसिंग यूटर्न घेणार्यांना ई-चलनाद्वारे दंड
♦ स्मार्टसिटी अंतर्गत 800 सीसीटीव्ही
♦ 40 सिग्नलवरील सीसीटीव्ही कार्यान्वित
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. बेशिस्तांच्या मोबाइलवर थेट एसएमएसद्वारे एनआयसी डॉटजीओव्ही डॉट इन यावरून दंडाचा मॅसेज जाणार आहे. दंड दोन-तीनपेक्षा अधिक वेळा थकविल्यास चालकाचा परवाना रद्द होणार आहे.
– किरिथिका सी.एम., पोलीस उपायुक्त, शहर वाहतूक विभाग
Beware.. From today, if you break the signal, you will be fined directly through e-challan