पहिल्याच महासभेत प्रशासकीय राजवटीचे वाभाडे

महापौरांकडून उपद्रव पथकाची नियुक्ती रद्द

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील अतिक्रमण, स्वच्छता, प्लास्टिक निर्बंधावर कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रशासकीय राजवटीत चार-पाच महिन्यांपूर्वी माजी सैनिकांच्या उपद्रव पथकाची नियुक्ती केली होती. या पथकातील कर्मचारी खंडणी वसुलीचे काम करत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी करत ही नियुक्ती रद्द करण्याची मागणी सभागृहात केली. त्यावर महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत प्रशासनाला माजी सैनिकांच्या उपद्रव पथकाच्या नियुक्ती रद्दचे आदेश दिले.

तब्बल चार वर्षांनंतर शुक्रवारी (दि.20) लोकप्रतिनिधींची पहिली नियमित महासभा महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, नगरसचिव मदन हरिश्चंद्र उपस्थित होते. शाहू खैरे यांनी, उपद्रव पथकामधील नियुक्त कर्मचारी मनमानी कारभार करून नागरिकांना वेठीस धरत असल्याने त्यांची नियुक्ती रद्द करावी, असे सांगितले. गुरुमित बग्ग्गा म्हणाले की, स्वच्छतेचे काम अतिक्रमण विभागाकडे कसे दिले जाते? ज्यांना कचर्‍याबाबत माहिती नाही त्यांना अधिकार देण्यात आले आहेत. साठ व्यक्तींवर महिन्याला तीस लाखांचा खर्च केला जातो आहे. या उपद्रव पथकामुळे महापालिकेची बदनामी होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजप गटनेते अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी अतिक्रमणवाले नागरिकांकडून दंड कसा वसूल करू शकतात? मनपाचे स्वच्छता निरीक्षक आहेत, त्यांनाच दंड वसूल करण्याचा अधिकार असावा. नागरिकांशी अरेरावी करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी बडोदे यांनी केली.

शहरातल्या युवकांना संधी : महापौर

उपद्रव पथकाबाबत सदस्यांनी मांडलेले मुद्दे गंभीर स्वरूपाचे असल्याने ही नियुक्ती रद्द केली जात आहे. तसेच शहरात युवक आहेत. त्यांना यासाठी संधी दिली जाऊ शकते. त्यांच्या माध्यमातून ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत प्रबोधन करून जनजागृती करता येईल. ज्यांना या कामासाठी संधी दिली जाईल, त्यांचे बॅकग्राउंंड पोलिसांकडून तपासून घेण्यात यावे, अशा सूचना महापौर आडके यांनी दिल्या.

घंटागाडी, अस्वच्छतेवरून तक्रारींचा पाऊस

महासभेत नगरसेवकांनी घंटागाडीच्या वेळेवरून तक्रारी मांडत प्रभागातील ब्लॅक स्पॉट जैसे थे असून, कर्मचारी नागरिकांशी उर्मटपणे बोलतात. समाधान देवरे यांनी, प्रभागात स्वच्छतेसाठी अपुरेे कर्मचारी असल्याचा मुद्दा उपस्थित केला. प्रवीण तिदमे यांनी, घंटागाडीवरील कर्मचार्‍याने महिलेला बादली फेकून मारल्याने त्या कर्मचार्‍याचे निलंबन करण्याची मागणी केली. समीर कांबळे यांनीही घंटागाडीवरील कर्मचार्‍यांच्या उद्धटपणावर बोट ठेवत कचरा वर्गीकरणाच्या नावाखाली नागरिकांना त्रास देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप केला.

फोन केला अन् 3 ऐवजी 5 हजारांचा दंंड : शैलेश ढगे

नाशिकरोड विभागातील जेल रोडच्या प्रभाग 17 मध्ये एका व्यक्तीला तीन हजारांचा दंड स्वच्छता विभागाच्या कर्मचार्‍यांनी केला. याबाबत नाशिकरोडचे स्वच्छता निरीक्षक अशोक साळवेे यांना फोन करीत विचारणा केली असता, त्या दंडाच्या रकमेत दोन हजारांनी वाढ करून संबंधिताला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे हा काय प्रकार आहे, असा सवाल उद्धवसेनेचे नगरसेवक शैलेश ढगे यांनी करून याप्रकरणी कारवाईची मागणी केली. यावेळी असाच प्रकार आमच्याबाबत घडल्याचे काही सदस्यांनी म्हटले.

बंटीलाही संधी द्या : दिनकर पाटील

सभागृहात एका विषयावर शिंदेसेनेचे प्रवीण तिदमे यांना प्रश्न मांडायचा असताना, गटनेते अजय बोरस्ते यांनी महापौरांकडे तिदमे यांना बोलू द्यावे असे म्हटले व बंटी बोल, असे म्हणताच त्यावेळी मागे बसलेले भाजप नगरसेवक दिनकर पाटील यांनी हाच शब्द पकडत बोरस्ते यांना ’अरे, बंटीलाही संधी द्या,’असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.

The very first general assembly witnessed the demise of administrative rule.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *