तत्काळ उपाययोजनेमुळे मोठा अनर्थ टळला
नाशिक : प्रतिनिधी
सातपूर औद्योगिक वसाहतीतील सीएट कंपनीसमोर एमजीएनएलच्या गॅस पाइपलाइनमधून अचानक गॅसगळती झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुमारे 20 ते 25 मिनिटे गॅसचे फवारे उडत असल्याने उद्योजक व कामगारांमध्ये खळबळ उडाली. तासभराच्या प्रयत्नांनंतर गळती नियंत्रणात आल्याने संभाव्य अनर्थ टळला. मात्र, काही उद्योगांचे उत्पादन ठप्प झाल्याने आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मार्गावर खोदकाम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून भूमिगत गॅस पाइपलाइनला भगदाड पडले. त्यानंतर मोठ्या दाबाने गॅस बाहेर पडू लागल्याने परिसरातील उद्योगांमध्ये धावपळ उडाली. विशेषतः समोर असलेल्या बाबासाई बेकरी येथे उत्पादनासाठी भट्ट्या सुरू असल्याने आगीचा धोका निर्माण होऊ शकतो, या भीतीने तातडीने सर्व यंत्रणा बंद करण्यात आल्या. भट्टीतील कच्चा माल बाहेर काढावा लागल्याने सुमारे दीड तास उत्पादन ठप्प राहिले व आर्थिक नुकसान झाल्याचे समजते.
दरम्यान, सीएट कंपनीतही खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ उत्पादन प्रक्रिया थांबवण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच एमजीएनएलचे आपत्कालीन पथक आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत गळती बंद केली. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर परिसरातील उद्योजकांचा जीव भांड्यात पडला.
आठवड्यात दुसरी घटना
अल्पावधीतच गॅस गळतीची दुसरी घटना घडल्याने औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी गॅस पाइपलाइन सुरक्षेबाबत अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटनांमुळे मोठा अपघात टाळण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करावे, असेही त्यांनी सांगितले.
Gas leak from MGNL pipeline in Satpur