राजपुत्र घराबाहेर

जगभरात एपस्टीन फाइल्सची चर्चा आहे. फाइल्समध्ये जगभरातील बड्या-बड्या लोकांची नावे असल्याचे उघड झाले आहे. जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील एक अब्जाधीश उद्योजक होता. जागतिक राजकारणी आणि सेलिब्रिटींशी त्याची मैत्री होती. एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप 2025 मध्ये होता. एका अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध केल्याबद्दल 2008 मध्ये त्याला दोषी ठरवण्यात आले. त्याने 13 महिने तुरुंगवास भोगला. गिलीन मॅक्सवेल नावाची त्याची प्रेयसी त्याला मुलींची तस्करी करण्यासाठी मदत करत होती. त्याला मदत केल्याबद्दल तिला 2021 मध्ये न्यायालयाने दोषी ठरवले. ती 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. सन 2019 मध्ये जेफ्रीला लैंगिक तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. खटल्यापूर्वी त्याने तुरुंगात आत्महत्या केली. एपस्टीनला 2005 मध्ये फ्लोरिडाच्या पोलिसांनी पकडले. एका 14 वर्षीय मुलीच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर मुलीचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल केली, तेव्हा पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी केली. तेथे अनेक मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे पुरावे सापडले. सन 2008 मध्ये त्याला 13 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पण दिवसभर बाहेर जाण्याची त्याला परवानगी होती. अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करीच्या आरोपावरून त्याला 2019 मध्ये न्यूयॉर्कमध्ये पुन्हा अटक झाली. एक महिन्यानंतर तो तुरुंगात मृत आढळला. त्याने आत्महत्या केल्याचे घोषित करण्यात आले. सन 2019 खटल्यातील न्यायालयीन दस्तऐवजांना ’एपस्टीन फाइल्स’ म्हणतात. यात 60 लाख पाने, र्ई-मेल्स, ’ब्लॅक बुक’ (संपर्क यादी), 2,000 व्हिडीओ आणि 1,80,000 फोटो आहेत, ज्यात उच्चपदस्थ व्यक्तींची नावे आहेत. पारदर्शकता म्हणून या फाइल्स खुल्या करण्याचा निर्णय अमेरिकन काँग्रेसने (प्रतिनिधी सभागृह) नोव्हेंबर 2025 मध्ये घेतला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 नोव्हेंबर 2025 रोजी निर्णयावर स्वाक्षरी केली. त्यानुसार एपस्टीनच्या लैंगिक तस्करी खटल्यातील सर्व दस्तऐवज (फाइल्स, ई-मेल्स, ब्लॅक बुक) 30 दिवसांत सार्वजनिक करणे. यामुळे न्याय विभागाला फाइल्स खुल्या करण्याचा आदेश मिळाला. त्या फाइल्स टप्प्याटप्प्याने खुल्या करण्यात आल्या. त्यात ई-मेल्स, फोटो, व्हिडीओ इत्यादी बरीच माहिती आहे. याशिवाय जगभरातील नामांकित व्यक्तींची माहिती आहे. यात ब्रिटनचे राजपुत्र (प्रिन्स) अ‍ॅण्ड्र्यू यांचे नाव आहे. त्यांना एपस्टीन फाइल्समधील बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली. गुरुवारी (दि. 19 फेब्रुवारी) सँडरिंगहॅम येथील निवासस्थानातून अ‍ॅण्ड्र्यू यांना ताब्यात घेण्यात आले. याच दिवशी अ‍ॅण्ड्र्यू यांचा वाढदिवस होता. ब्रिटिश राजघराण्याला हादरवून टाकणारी ही एक मोठी गोष्ट आहे. ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांचे धाकटे बंधू प्रिन्स अँड्र्यू यांना सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याच्या संशयावरून पोलिसांनी अटक केली. पीडित व्हर्जिनिया गिफ्रे यांनी असा आरोप केला होता की, 2001 मध्ये जेव्हा त्या अवघ्या 17 वर्षांच्या होत्या, तेव्हा प्रिन्स अ‍ॅण्ड्र्यू यांनी त्यांच्यावर बलात्कार केला आणि त्यांचे लैंगिक शोषण केले. त्यावेळी अ‍ॅण्ड्र्यू हे ब्रिटनचे व्यापार दूत म्हणून कार्यरत होते. अ‍ॅण्ड्र्यू यांनी हे सर्व आरोप फेटाळले असले, तरी अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या कागदपत्रांमध्ये त्यांचे एपस्टीनशी असलेले जवळचे संबंध उघड झाले आहेत. या गुन्ह्यासाठी इंग्लंडमध्ये जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. या गंभीर आरोपानंतर किंग चार्ल्स यांनी आपल्या भावाविरुद्ध अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. बकिंगहॅम पॅलेसने जारी केलेल्या निवेदनानुसार, अ‍ॅण्ड्र्यू यांच्याकडून ‘प्रिन्स’ हा किताब, सर्व लष्करी पदव्या आणि शाही सन्मान काढून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता त्यांना ‘प्रिन्स अ‍ॅण्ड्र्यू’ऐवजी केवळ ‘अ‍ॅण्ड्र्यू माउंटबॅटन-विंडसर’ या नावाने ओळखले जाईल. ब्रिटिश इतिहासात 106 वर्षांनंतर एखाद्या राजपुत्राची पदवी काढून घेण्याची ही पहिलीच घटना आहे. अ‍ॅण्ड्र्यू यांना केवळ पदव्याच नव्हे, तर त्यांचे आलिशान निवासस्थान ‘रॉयल लॉज’देखील रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 2003 पासून ते या तीस खोल्यांच्या महालात राहत होते. आता त्यांना हे घर सोडून साध्या खासगी घरात राहावे लागेल. त्यांच्यासोबत राहणारी त्यांची पत्नी सारा फर्ग्युसनलाही घर सोडावे लागणार आहे. या प्रकरणातील मुख्य तक्रारदार व्हर्जिनिया गिफ्रे यांचे एप्रिल 2025 मध्ये निधन झाले. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे म्हटले गेले. मात्र, त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी ‘नो बॉडीज गर्ल’ हे आत्मचरित्र पूर्ण केले होते, जे 21 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांनी अ‍ॅण्ड्र्यू यांच्याबद्दल धक्कादायक खुलासे केले असून, लैंगिक संबंध प्रस्थापित करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क असल्याचे अ‍ॅण्ड्र्यू यांना वाटायचे, असा दावा गिफ्रे यांनी केला आहे. एपस्टीन यांच्याशी ज्यांची ज्यांची भेट या-ना-त्या कारणास्तव झाली, त्यांनी खुलासे केले असले, तरी त्यांच्यावर आरोपही होत आहेत. एपस्टीन फाइल्समधील खुलाशांमुळे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि नॉर्वे यांसारख्या देशांमध्ये राजकीय उलथापालथ झाली आहे. माजी ब्रिटिश राजदूत पीटर मँडेलसन यांनी लेबर (मजूर) पार्टीचा राजीनामा दिला. कागदपत्रांमधून असे दिसून आले की, एपस्टीन यांनी त्यांच्याशी जोडलेल्या खात्यांमध्ये 25 हजार डॉलर्सचे तीन पेमेंट केले होते. मँडेलसनव्यतिरिक्त स्टारमरचे चीफ ऑफ स्टाफ मॉर्गन मॅकस्विनी यांनीही राजीनामा दिला आहे. मॅकस्विनीने मँडेलसनला अमेरिकेत ब्रिटनचे राजदूत होण्याचा सल्ला दिला होता. मॅकस्विनीने हा सल्ला चुकीचा असल्याचे मान्य केले आणि त्याची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला. स्टारमरने अ‍ॅण्ड्र्यू (माजी राजकुमार) यांनी अमेरिकन काँग्रेससमोर साक्ष देण्याची मागणी केली होती. मँडेलसनव्यतिरिक्त ब्रिटनमधील इतर राजकीय व्यक्तींचीही चौकशी सुरू आहे. फ्रान्स, नॉर्वे, स्लोव्होकिया, स्वीडन, अमेरिका इत्यादी देशांतील अनेक उच्चपदस्थांनी व राजकीय नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. एपस्टीनसोबत केवळ व्यावसायिक किंवा सामाजिक संबंध असल्याचे सांगत गुन्ह्यात सहभाग नाकारला असला, तरी इतके मोठे लोक एका गुन्हेगाराच्या संपर्कात का होते, यावरून जागतिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी एपस्टीनला भेटल्याची कबुली दिली. त्याला भेटल्याबद्दल पश्चातापही होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एपस्टीनने लिहिलेल्या एका न पाठवलेल्या ई-मेलचा फाइल्समध्ये समावेश आहे. यात दावा करण्यात आला होता की, एपस्टीनने गेट्स यांना अमली पदार्थ पुरवण्यास आणि रशियन तरुणींशी असलेल्या संबंधांचे प्रकरण हाताळण्यास मदत केली होती. हे सर्व आरोप बिल गेट्स यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. एपस्टीन फाइल्सनी जगभर धुमाकूळ घातली असताना भारताचाही दुरान्वये संबंध आलेला आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू, गृहनिर्माण खात्याचे केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचीही मंत्री होण्यापूर्वी एपस्टीनशी भेट झाली होती. पुरी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात लावून धरली होती. राहुल गांधी यांचे आरोप पुरी यांनी
फेटाळून लावले आहेत. मात्र, एपस्टीनशी वेगळ्या कारणाने भेट झाली होती, हे त्यांनी मान्य केले आहे. एपस्टीनशी झालेली भेट ही केवळ ‘इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूट’च्या (आयपीआय) शिष्टमंडळाचा एक भाग म्हणून होती आणि शिष्टमंडळाचा गुन्हेगारी कृत्यांशी कोणताही संबंध नाही, असे पुरी यांनी म्हटले. ज्यांची नावे फाइल्समध्ये आहेत, ते सर्व आपली बाजू मांडत आहेत. एपस्टीन फाइल्स गंभीर आहे. त्यात डोनाल्ड ट्रम्प, एलन मस्क, बिल क्लिंटन अशा मोठमोठ्या व्यक्तींची नावे आहेत. सर्वच गुन्ह्यांत असतील असे नाही. मात्र, गुन्हे सिद्ध झाल्यावर वादळ उठते म्हणून अनेकांनी राजीमामे दिले, तर प्रिन्स अ‍ॅण्ड्र्यू यांना अटक झाली आहे. एपस्टीन फाइल्स कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करील, याचा नेम नाही. पण या फाइल्सचा धसका जगभरातील अनेक उद्योजक, राजकारणी यांनी घेतलेला आहे.

The prince is outside the house.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *