म्हसरूळ गुलमोहरनगर परिसरात टवाळखोरांचा धुमाकूळ

रात्रीच्या वेळी नशेखोरांचा उपद्रव; नागरिक त्रस्त

पंचवटी : प्रतिनिधी
म्हसरूळ परिसरातील गुलमोहरनगर भागात गेल्या काही दिवसांपासून टवाळखोरांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या अंधारात गांजा, मद्य आणि इतर अमली पदार्थांचे उघडपणे सेवन केले जात असून, या टोळक्यांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ‘मेरी-म्हसरूळ’ पट्ट्यातील गुन्हेगारीचा इतिहास पाहता पोलिसांनी वेळीच आवर न घातल्यास मोठ्या घटनेची शक्यता नाकारता
येत नाही.
अभिषेक विहार हा शांत रहिवासी परिसर म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रात्री दहानंतर या भागाचे चित्र पालटते. परिसरातील कोपर्‍यात, अंधार्‍या गल्ल्यांमध्ये आणि उद्यानांच्या परिसरात तरुणांची टोळकी जमतात आणि याच ठिकाणी उघडपणे गांजा ओढला जातो. मद्याच्या पार्ट्या झोडल्या जातात. तसेच नशेत असलेल्या या तरुणांकडून मोठ्याने ओरडणे, शिवीगाळ करणे आणि अश्लील भाषेत संभाषण करण्याचे प्रकार घडत आहेत. तरुणांची संख्या मोठी असल्याने आणि त्यांच्याकडे धारदार शस्त्रे असण्याच्या भीतीने नागरिक त्यांना हटकण्याचे धाडस करत नाहीत.

पोलिसांचा ‘बालेकिल्ला’ थंडावला

नाशिक पोलिसांनी शहरात ’कायद्याचा बालेकिल्ला’ मोहीम राबवून गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पुन्हा म्हसरूळ परिसरातील या उपनगरांमध्ये कोम्बिंगसारखे ऑपरेशन राबवून या भागातील टवाळखोरांवर जरब बसविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच अभिषेक विहार परिसरातील हा दहशतीचा ’अड्डा’ बंद करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांसमोर आव्हान

मेरी आणि म्हसरूळ परिसरात यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न आणि टोळीयुद्ध यांसारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. अशा घटनांची मुळे ही अशाच लहान लहान वादांतून घडतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने वेळीच या भागाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या परिसरातील महिलांना संध्याकाळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. टवाळखोरांच्या संशयास्पद हालचालींमुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, आम्हाला स्वतःच्या घरातही सुरक्षित वाटत नाही. शांतताभंग होत असून, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांच्या मागण्या

गुलमोहरनगर, अभिषेक विहार परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, संशयास्पदरीत्या फिरणार्‍या तरुणांची चौकशी करून कडक कारवाई करावी, ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून नशेबाजांचे अड्डे उद्ध्वस्त करावेत. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून टवाळखोरांवर नजर ठेवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *