कुंभमेळा प्राधिकरणासमोर डेडलाइनचे शिवधनुष्य

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे 25 हजार कोटींहून अधिकची विविध विकासकामे प्रस्तावित असून, त्यांपैकी दहा हजार कोटींंची कामे नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सुरू असल्याची माहिती सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी चार दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मार्च 2027 पर्यंत प्रमुख पायाभूत सुविधा पूर्णत्वास नेण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कुंभमेळा सुरू होण्यापूर्वीच सर्व कायमस्वरूपी कामे पूर्ण होतील, तर तात्पुरती कामे सोहळ्याच्या तीन महिने आधी पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले.
प्राधिकरणाकडून सिंहस्थाच्या तयारीसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. मात्र, सिंहस्थाच्या तयारीला सुरुवातीला झालेला विलंब हा चर्चेचा विषय ठरला. साधू-महंत, विविध आखाडे, तसेच सर्वसामान्य नाशिककरांनीही तयारीच्या गतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर प्रशासनाने अधिकार्‍यांच्या बदल्या करून कामांना वेग देण्याचा प्रयत्न केला. यंदा प्रथमच स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करून सिंहस्थाचे नियोजन केंद्रित पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही बाब सकारात्मक असली, तरी नियोजनाची फलश्रुती प्रत्यक्ष कामांमधून दिसणे अधिक महत्त्वाचे आहे.
मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत यंदा पाचपट अधिक गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देश-विदेशातून येणार्‍या भाविकांची संख्या कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन सेवा, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था यांचा मजबूत आराखडा आवश्यक आहे. कुंभमेळ्याच्या काळात काही दिवसांतच लाखो भाविक गोदावरी तीरावर स्नानासाठी जमतात. त्यावेळी कोणतीही छोटी चूक मोठ्या दुर्घटनेत रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे पायाभूत सुविधांची उभारणी केवळ वेगवानच नव्हे, तर अत्यंत दर्जेदार असणे आवश्यक आहे. सध्या शहरात विविध रस्ते विकासकामांना सुरुवात झाली आहे. द्वारका ते नाशिकरोड या महत्त्वाच्या मार्गावरील कामेही सुरू आहेत. काही पूल, सांडपाणी व्यवस्थापन आणि रस्त्यांचे रुंदीकरण यांसारखी कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, या कामांची गती अपेक्षेपेक्षा कमी असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. अनेक प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया अद्याप सुरू असल्याने प्रत्यक्ष कामांना सुरवात होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. मार्च 2027 पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यासाठी उर्वरित कालावधीत दुप्पट वेगाने काम करणे अपरिहार्य ठरणार आहे.
सिंहस्थासाठी प्रस्तावित 65 किलोमीटर लांबीच्या रिंगरोडला विशेष महत्त्व आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सिंहस्थ काळातील गर्दी सुरळीतपणे वळविण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक ठरणार आहे. मात्र, या रिंगरोडसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या संपादनाचा मुद्दा तापला आहे. शेतकर्‍यांचा आरोप आहे की, जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी जमीन देण्यास नकार देत आहेत. परिणामी भूसंपादन प्रक्रिया लांबल्यास संपूर्ण प्रकल्पावर परिणाम होऊ शकतो. विकासकामांची तातडी आणि शेतकर्‍यांचा विश्वास जपणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधीही शेतकर्‍यांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाला पारदर्शक आणि न्याय्य प्रक्रिया राबविण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असेल.
दरम्यान, मार्च 2027 पर्यंतच्या कालावधीत सुमारे चार महिने पावसाळ्याचे असतील. त्या काळात मोठ्या प्रमाणावर रस्ते आणि बांधकामाची कामे मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत काटेकोर नियोजन, यंत्रसामग्रीचा पुरेपूर वापर आणि शासकीय विभागांत समन्वय आवश्यक आहे. वेळेचे व्यवस्थापन हेच या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वांत मोठे आव्हान ठरणार आहे. कामे वेळेत पूर्ण करण्याच्या नादात दर्जाशी तडजोड होणे परवडणारे नाही. निकृष्ट दर्जाची कामे भविष्यात आर्थिक नुकसानीचे व दुर्घटनेचे कारण ठरू शकतात. सिंहस्थ हा केवळ काही दिवसांचा धार्मिक उत्सव नसून त्यातून उभारल्या जाणार्‍या पायाभूत सुविधा पुढील अनेक वर्षे शहराच्या विकासाला दिशा देणार आहेत. म्हणूनच वेळेत आणि दर्जेदार या दोन्ही निकषांची सांगड घालणे आवश्यक ठरणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, शेतकरी, व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्य नागरिक यांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. केवळ शासनाच्या यंत्रणेवर अवलंबून राहून इतका मोठा सोहळा यशस्वी करणे शक्य नाही. सार्वजनिक सूचना, नागरिकांचा अभिप्राय, पारदर्शक माहिती प्रसार आणि तक्रार निवारण यंत्रणा सक्षम केल्यास विश्वास निर्माण होऊ शकतो. प्राधिकरणासमोर खरोखरच शिवधनुष्य आहे. वेळ मर्यादित, अपेक्षा प्रचंड आणि आव्हाने बहुआयामी आहेत. येत्या वर्षभरात कामांची गती वाढवून, भूसंपादनाचे प्रश्न सोडवून आणि नागरिकांचा विश्वास संपादन करून प्रशासनाने नियोजनाची अंमलबजावणी केली, तर सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकच्या इतिहासातील यशस्वी अध्याय ठरू शकतो. अन्यथा ग्वाही आणि वास्तव यातील दरी अधिक ठळकपणे समोर येईल. पुढील काही महिने निर्णायक असणार आहेत आणि त्यावरच सिंहस्थाच्या यशाची खरी कसोटी अवलंबून असेल.प्राधिकरणाने विकासकामांच्या डेडलाइनचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले तर सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीपणे पार पडेल.

Deadline looms before Kumbh Mela Authority

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *