भोंदू खरातचा निकटवर्तीय शेळकेंचा पत्नीसह मृत्यू

’समृद्धी’वर भीषण अपघात, मुलगा गंभीर

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा शुक्रवारी (दि. 17) दुपारी बाराच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीला जात असताना त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार उभ्या कंटेनरला कारने मागून धडक दिली. कार थेट कंटेनरखाली घुसली. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शी आणि छत्रपती संभाजीनगर- शिर्डी महामार्गावर अपघात झाला तेथील धोत्रे गावचे सरपंच प्रदीप चव्हाण यांनी सांगितले की, हा अपघात साधारणपणे दुपारी 12:30 च्या सुमारास समृद्धी महामार्गावरील किलोमीटर 506.6 जवळ झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कारने मागून जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच सरपंच आणि ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहोचले. कारमध्ये महिला, पुरुष आणि एक 10-12 वर्षांचा मुलगा होता. मुलाला तातडीने कारबाहेर काढून रुग्णवाहिकेने रुग्णालयात रवाना करण्यात आले. मुलाने स्वतःचे नाव आणि जितेंद्र शेळके यांचा मुलगा असल्याची माहिती दिली. अपघातात दोन दोघांचा (जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा) जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले.सरपंच प्रदीप चव्हाण यांनी बचाव कार्यासाठी लागणार्‍या क्रेन तब्बल पावणेदोन तास उशीर आले. जर क्रेन आणि मदत अर्ध्या-पाऊण तासात मिळाली असती, तर कारमध्ये अडकलेल्या महिलेला कदाचित वाचवता आले असते, असा दावा त्यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, अनुराधा जितेंद्र शेळके या कारमध्ये पुढे होत्या, त्या आतमध्ये अडकल्या होत्या, त्यांचा पाय फक्त आम्हाला दिसत होता, त्यांना बाहेर काढता आले नाही, मुलाला मोठ्या प्रयत्नानंतर बाहेर काढले, असेही त्यांनी सांगितले. मुलाला आम्ही बाहेर काढले, त्याचा हात तुटला होता, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
शेळकेंचा अपघात की घातपात? : मिटकरी
भोंदू अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकें अपघात प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी प्रतिक्रिया व्यक्त केली. चौकशी लागलेली असतानाच दोन दिवसांत शेळके यांचा अपघाती मृत्यू. शेळके यांचा अपघात की घातपात? हा मोठा संशय आहे. जितेंद्र शेळके यांच्या वाहनाचे ब्रेक फेल झाले होते की केले गेले होते? याचा शोध घेतला गेला पाहिजे, अशी आमदार मिटकरी यांची मागणी आहे. अशोक खरात प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न होत आहे का?, त्यामुळे जितेंद्र शेळके यांचा अपघात की घातपात? या मागील खरे सत्य समोर येणारच नाही, अशीही खंत आमदार मिटकरींनी व्यक्त केली.
रोहित पवार यांनाही संशय- दरम्यान, रोहित पवार यांनीही ट्विट करून शंका उपस्थित केली आहे. शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोदू अशोक खरातचे सहकारी जितेंद्र शेळके यांचे अपघाती झालेले निधन धक्कादायक आहे. अजूनही पुढे न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढे येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे? – शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर व्हिडीओ जारी करत म्हटले आहे की, खरात प्रकरणातील एक महत्त्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे संचालक शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी धक्कादायक आहे. मला ही गोष्ट अविश्वसनीय वाटते. अनेक दिवसांपासून अनेक नेत्यांनी भीती व्यक्त केली होती की, खरातच्या जीवाला धोका असू शकतो. आजची जी घटना घडली त्या घटनेने या शक्यतेला अधिक ठळक पद्धतीने अधोरेखित केले आहे. खरात प्रकरणातील काही सत्यच बाहेर येऊ नयेत, असे काही लोकांना वाटत आहे का?

Bhondu Kharat’s close associate Shelke dies along with his wife

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *