कोटमगाव येथील स्थिती; जगतापांंच्या मध्यस्थीने वाहतूक सुरू
लासलगाव : प्रतिनिधी
लासलगाव-पिंपळगाव (ब) मार्गावरील कोटमगाव येथील रेल्वे पुलाला दोन दिवसांपूर्वी एका ट्रकने धडक दिल्याने पुलाच्या स्लॅबचे नुकसान झाले आहे. या स्लॅबमधून खडी पडू लागल्याने रेल्वे वाहतुकीला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचे पी.डब्लू.आय. सिंग आणि असिस्टंट इंजिनिअर यादव यांनी हाइट गेज (उंचीरोधक) लावण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, या निर्णयामुळे परिसरातील रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
रेल्वे पुलाची उंची कमी करण्यासाठी हाइट गेज लावल्यामुळे या मार्गावरून धावणार्या बस बंद झाल्या आहेत. सध्या शाळा व महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू असून, बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचणे कठीण झाले आहे.दुसरीकडे, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी येणारे ट्रॅक्टर याच पुलाखालून जातात. उंची कमी केल्यास हे ट्रॅक्टर बाजार समितीत पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी डी. के. जगताप यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले की, जर बस व ट्रॅक्टरची वाहतूक बंद झाली, तर उद्यापासून शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, शेतकरी बांधवांचे मोठे हाल होतील. अनेक वर्षांपासून हा मार्ग सर्वांसाठी सोयीचा ठरला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.विशेष म्हणजे, डी. के. जगताप यांच्या प्रयत्नातून याठिकाणी नवीन पूल बांधून तयार आहे. परंतु महावितरणच्या विद्युततारा आणि केबल योग्य उंचीवर नसल्यामुळे या नवीन पुलावरून वाहतूक करणे सध्या शक्य होत नाही. जोपर्यंत या तारांचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत जुन्या पुलाचा वापर करणे, हाच एकमेव पर्याय आहे.
या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून महावितरणकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. महावितरणने तारा काढण्याचे काम पूर्ण करताच सर्व वाहतूक नवीन पुलावरून वळवण्यात येईल. तोपर्यंत किमान 15 ते 20 दिवस रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे आणि पुलाची उंची कमी करू नये, अशी विनंती जगताप यांनी केली आहे. नवीन पुलावरून वाहतूक सुरू होताच रेल्वेने जुन्या पुलाबाबत घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला आमची तक्रार राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Traffic disrupted due to lowering of railway bridge height