कारवाईसाठी महाआयटीला अहवाल सादर, मनपा आयुक्त खत्रींची माहिती
नाशिक : प्रतिनिधी
स्मार्ट सिटी कंपनीने शहरात महत्त्वाच्या ठिकाणी महाआयटी कंपनीच्या माध्यमातून एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. यासाठी ऐंशी कोटींचा खर्च आला होता. मात्र, सहा वर्षांतच सीसीटीव्ही नादुरुस्त झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत या सीसीटीव्ही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाआयटीला दोनदा अहवाल पाठविण्यात आला आहे.
शहरातील विविध भागांत सीसीटीव्ही बसविण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने महाआयटी संस्थेच्या माध्यमातून शहरभर एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे ऐंशी कोटींच्या निधीतून बसविण्यात आले होते. मात्र, हे सर्व कॅमेरे खराब झाल्याची धक्कादायक माहिती महापालिका आयुक्त खत्री यांनी दिली. येणार्या सिंहस्थात भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यातून सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. यापूर्वी 2019 मध्ये हे सीसीटीव्ही शहरात बसविण्यात आले होते. दरम्यान, सिंहस्थासाठी पावणेदोन वर्षांचा कालावधी बाकी राहिला आहे. सिंहस्थात दोन कोटी भाविक शहरात येण्याचा अंदाज असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना उभारण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. याकरिता शहरात सीसीटीव्ही कॅमेर्यांचे जाळे विणले जाणार असून, याद्वारे गर्दीवर लक्ष ठेवण्याबरोबरच गैरकृत्य रोखण्याकरिता या कॅमेर्यांची पोलीस प्रशासनाला मदत होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यांसाठी बीएसएनएल कंपनीकडून ऑप्टिकल फायबर सुविधा भाड्याने घेण्यात आली. मात्र, सुरुवातीपासूनच या प्रकल्पासाठी अडचणी आल्या. दरम्यान, सीसीटीव्ही प्रकरणाची सखोल चौकशी करून यातील दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, याबाबतचा अहवाल महाआयटीकडे पाठविला आहे.
CCTV worth Rs 80 crores in water