हरसूल परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
तालुक्यातील हरसूल भागात 24 तासांत भूकंपाचे चार सौम्य धक्के नोंदवले गेल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. रविवारपासून हे धक्के जाणवत आहेत. रविवारी (दि. 22) सायंकाळी 7 वाजून 49 मिनिटांनी 1.5 रिश्टर स्केल, मध्यरात्री 1.35 रिश्टर स्केल, पहाटे व सकाळी 1.2 रिश्टर स्केलचे दोन वेळा धक्के जाणवले.
नाशिकच्या मेरी संस्थेच्या भूकंपमापन केंद्रात हे धक्के नोंदवले गेले आहेत. धक्के सौम्य असल्याने यात मोठी नुकसान नाही. मात्र, ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार गुजरात सीमेवर असलेल्या वाघ नदी परिसरातील घरांच्या भिंतीना तडे गेले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूगर्भात आवाजदेखील झाले होते.
हरसूल भागात ग्रामस्थ भीतीच्या वातावरणात आहेत. रविवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवल्याने वाडी-वस्तीवर वास्तव्यास असलेले ग्रामस्थ घराबाहेर झोपले. घरात अथवा आडोशाला भूकंपाची भीती, तर घराबाहेर उघड्यावर बिबट्याची, तसेच वन्य श्वापदांची भीती त्यामुळे हरसूल भागातील नागरिक धास्तावले आहेत. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने लक्ष घालून ग्रामस्थांना भूकंप झाल्यास काय करायचे, याचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांत शिबिर घेणे, पथनाट्याच्या अथवा लोककलेच्या माध्यमातून माहिती देणे आवश्यक आहे. त्याचसोबत खुल्या मैदानात भूकंपप्रवण क्षेत्रात असतात त्याप्रमाणे मोठमोठे निवारा शेड उभारणे गरजेचे आहे.
दहावी, बारावी आणि शाळा, महाविद्यालयाच्या परीक्षांचा कालावधी सुरू आहे. भूकंपाच्या धास्तीने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. हरसूल भाग दुर्गम आहे. नाशिकला जोडणारा रस्ता आपत्ती निर्माण झाल्यास बंद पडला, तर या भागात मदत पोहोचवणे अवघड होईल. मोबाईल नेटवर्क सद्य:स्थितीला काम देत नाही. त्यासाठी आपत्तीची शक्यता लक्षात घेऊन दळणवळणाची साधने विकसित करणे आवश्यक आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *