मुंबईत दोन राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित
नाशिक : प्रतिनिधी
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणार्या आयुष्मान भारत डिजिटल मिशनअंतर्गत विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेेखनीय कामगिरी नोंदवली. ई-सुश्रुतच्या 15 पैकी 15 मॉड्यूल्सची प्रभावी अंमलबजावणी करत रुग्णालयाने रुग्णसेवा पूर्णपणे डिजिटल केली आहे. 100 टक्के कागदविरहित कामकाजाची अंमलबजावणी केली आहे.
जानेवारी 2026 या एकाच महिन्यात दहा हजारांहून अधिक टोकन जनरेट करण्याचा विक्रम रुग्णालयाने केला. त्यांपैकी 8101 आधार लिंक आणि 5137 हेल्थ लिंकेज ऑनलाइन ओपीडीद्वारे पूर्ण करण्यात आले. ही राज्यातील सर्वाधिक नोंद आहे. रुग्णालयातील 15 विभागांचे कामकाज ई-सुश्रुत सॉफ्टवेअरमार्फत पूर्णपणे डिजिटल करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांची नोंदणी, तपासण्या, उपचार व संदर्भ प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक झाली आहे.
अत्यंत गुंतागुंतीच्या, अतिगंभीर तसेच कर्करोगग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार व अतिविशिष्ट शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिल्याबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण पवार यांचा दोन प्रतिष्ठित राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील उल्लेेखनीय कार्यासाठी दिल्या जाणार्या ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ आणि ‘महाआरोग्य सन्मान-2026’ या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. यशवंतराव चव्हाण सेंटर (मुंबई) येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते हा सन्मान सोनाली कोटमे, डॉ. अरुण पवार, डॉ. शेवाळे, सारिका वाघ, डॉ. सुनीता गोल्हाईत यांना प्रदान करण्यात आला.
पुरस्कारांचे मानकरी
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (नाशिक): आयुष्मान भारत डिजिटल मिशनअंतर्गत आरोग्य जोडणीत राज्यात प्रथम. (ई-सुश्रुत 15/15 मोड्यूल्स, राज्यात सर्वाधिक आयुष्मान भारत डिजिटल मिशन-हेल्थ लिंकेजेस), प्राथमिक आरोग्य केंद्र, खेड (इगतपुरी): जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावर राज्यात प्रथम. प्राथमिक आरोग्य केंद्र, सय्यद पिंप्री : डिजिटल हेल्थ लिंकेजेसमध्ये राज्यात द्वितीय. ग्रामीण रुग्णालय पेठ : जिल्हास्तरावर सर्वोत्तम रुग्णालय. प्राथमिक आरोग्य केंद्र, धोंडेगाव : सुरक्षित प्रसूती (107) आणि नसबंदी शस्त्रक्रिया (250). उत्कृष्ट कामगिरी ः मंगल वाघ (आशा स्वयंसेविका, राजापूर): उत्कृष्ट कार्यासाठी गौरव.