तीव्र उतार व वळणाचा अंदाज चुकल्याने अपघात
सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहदरी घाटातील धोकादायक वळणांमुळे पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली. मंगळवारी (दि. 3) सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास तीव्र उतारावरून येणारा अवजड कंटेनरचालकाचा ताबा सुटल्याने थेट दुभाजकावर चढला. या अपघातामुळे सिन्नरहून नाशिककडे जाणारी वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली.
सिन्नरकडून नाशिककडे जात असताना मोहदरी घाटाच्या शेवटच्या टप्प्यात चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला.
तीव्र उतार आणि अचानक येणार्या वळणाचा अंदाज न आल्याने कंटेनर थेट दुभाजकावर जाऊन धडकला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, महामार्गावरील एका बाजूची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करण्यात आला. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर वाहतूक संथगतीने पूर्ववत करण्यात पोलिसांना यश आले.
शेवटचा टप्पा ठरतोय ‘डेथ ट्रॅप’
नाशिककडे उतरताना मोहदरी घाटाचा शेवटचा टप्पा अत्यंत धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी उतार जास्त असून, वाहनांचा वेगही वाढलेला असतो. अचानक येणार्या वळणाचा अंदाज न आल्याने वाहनांचे नियंत्रण सुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात झाले असल्याने येथे वेगमर्यादा फलक, रंबल स्ट्रिप्स, अतिरिक्त सुरक्षा बॅरिअर आणि सतर्कता सूचनाफलक तातडीने बसवण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
Containers at Mohdari Ghat on divider; traffic halted