फिरकीचा जादूगार शेन वॉर्न

बरोबर चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (दि. 4 मार्च 2022) क्रिकेटविश्वाला धक्का देणारी बातमी आली आणि शोककळा पसरली. ही बातमी होती फिरकीचा जादूगार ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न यांच्या निधनाची. अनेकांचा या बातमीवर विश्वास बसत नव्हता. शेन वॉर्न असा अकाली निघून गेल्याने क्रिकेटविश्वाला जबर धक्का बसला.
वयाच्या अवघ्या 52 व्या वर्षी या महान गोलंदाजाने जगाचा निरोप घेतला. शेन वॉर्न हा केवळ ऑस्ट्रेलियाचाच नाही, तर जगातला सर्वोत्तम फिरकी गोलंदाज होता. आपल्या फिरकीच्या तालावर त्याने जगातील सर्वच दिग्गज फलंदाजांना नाचवले. जवळपास वीस वर्षे त्याने आपल्या फिरकीच्या बळावर क्रिकेटविश्वावर राज्य केले.
13 सप्टेंबर 1969 रोजी ऑस्ट्रेलियाच्या फॉन्टरी गली येथे जन्मलेल्या शेन वॉर्नने जेव्हा फिरकी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला सर्वांनी वेड्यात काढले. कारण ऑस्ट्रेलिया म्हणजे वेगवान गोलंदाजांची भूमी. खेळपट्ट्या वेगवान. त्यामुळे तिथे त्याची फिरकी चालणार नाही असेच सर्वांचे मत होते. अनेकांनी त्याला फिरकी गोलंदाजी न करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याने कोणाचेही ऐकले नाही. तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चमकदार कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधले. सातत्याने चांगली गोलंदाजी केल्याने अखेर त्याला ऑस्ट्रेलियाच्या मुख्य संघात प्रवेश मिळाला. 1992 साली त्याने भारताविरुद्धच आपली पहिली कसोटी खेळली. मात्र, या कसोटीत त्याला विशेष काही करता आले नाही. भारताच्या फलंदाजांनी त्याची गोलंदाजी लीलया खेळून काढली. याच कसोटीत भारताचा सलामीवीर रवी शास्त्रीने द्विशतक केले. पहिल्या कसोटीत विशेष काही करता न आल्याने त्याच्यावर टीकाही झाली. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होणार नाही, असाही तर्क अनेकांनी काढला. मात्र, त्याने हार मानली नाही. टीकाकारांकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. त्याचे फळ त्याला लवकरच मिळाले. इंग्लंडविरुद्धच्या प्रतिष्ठेच्या अ‍ॅॅशेस मालिकेत त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. आपल्या फिरकीच्या बळावर त्याने ही मालिका ऑस्ट्रेलियाला एकहाती जिंकून दिली.
इंग्लंड फलंदाजांना शेन वॉर्नची फिरकी समजलीच नाही.त्याने अक्षरशः मामा बनवले. याच मालिकेत वॉर्नने असा चेंडू टाकला की, ज्याने फलंदाजच नव्हे, तर क्रिकेटविश्वच अचंबित झाले.वॉर्नने इंग्लंडच्या माईक गॅटिंगला ऑफ साइडला चेंडू टाकला. गॅटिंगला वाटले की, चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर असल्याने तो वाईड ठरेल म्हणून त्याने तो सोडून दिला. मात्र, चेंडूने अचानक 180 अंशात वळून चक्क गॅटिंगच्या लेग स्टम्पवर धडकला. या चेंडूने केवळ फलंदाजच नव्हे, तर क्रिकेटविश्वच हादरले. असा चेंडू यापूर्वी
क्रिकेटमध्ये कोणत्याची गोलंदाजाने टाकला नव्हता. म्हणूनच या चेंडूला बॉल ऑफ सेंच्युरी असे म्हणतात. न भूतो न भविष्यति असा तो चेंडू होता. 1993 साली शेन वॉर्नने हा स्वप्नवत चेंडू टाकला. आज इतक्या वर्षांनंतरही हा चेंडू क्रिकेट रसिकांच्या स्मरणात आहे.
वॉर्नची गोलंदाजीची शैली अनोखी होती. या अनोख्या शैलीनेच त्याने 145 कसोटींत 708 बळी घेतले. त्यातील 448 बळी हे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये घेतले. येथे एक लक्षात घ्यावे लागेल की, या दोन्ही देशांतील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असतात. वेगवान खेळपट्ट्यांवर इतके बळी मिळवणे ही अनन्यसाधारण गोष्ट आहे. त्याने 145 कसोटींत खेळताना 37 वेळा एका डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले आहेत. कसोटींत दहा किंवा दहापेक्षा अधिक बळी त्याने दहा वेळा घेतले आहेत. इतकेच नाही, तर त्याने 194 एकदिवसीय सामन्यांत 293 बळी घेतले आहेत. 1999 मध्ये इंग्लंडमध्ये झालेला विश्वचषक ऑस्ट्रेलियाने वॉर्नच्या फिरकीच्या बळावरच जिंकला होता.
वॉर्नने जगभरातील दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. जगातील सर्वच देशांत त्याने अप्रतिम कामगिरी करीत बळी मिळवले. मात्र, त्याला भारतात म्हणावे तसे यश मिळाले नाही. सचिन व वॉर्न यांचे क्रिकेट मैदानावरील द्वंद्व क्रिकेटरसिकांसाठी पर्वणी ठरायचे. सचिनला बाद करण्यासाठी वॉर्न जंग-जंग पछडायचा. मात्र, त्याला त्यात यश मिळायचे नाही. शारजात झालेल्या मालिकेत सचिनने वॉर्नची चांगलीच पिटाई केली तेव्हा सचिन मला स्वप्नातही दिसतो, अशी कबुली त्याने दिली होती. मैदानावर हे दोन महान खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकत असले तरी मैदानाबाहेर मात्र ते एकमेकांचे जिवलग मित्र होते. फिरकीचा जादूगार शेन वॉर्नला चौथ्या स्मृतिदिनी अभिवादन!

Spin wizard Shane Warne

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *