हॅलो राधिका, अगं तू हास्य क्लबला येणार होतीस ना? मी आपली दररोज तुझी वाट पाहते आहे.
अगं बघ ना सविता, मी ज्या दिवशी हास्य क्लबला यायचं ठरवते ना, त्या दिवशी नेमकं काहीतरी कारण उद्भवतं…. आज काय लेकीला शाळेत लवकर जायचंय, तिचा डबा लवकर करायचाय… तर कधी उद्या नळाला पाणी येणार नाही म्हणून पाणी भरायचं काम… अगं म्हणूनच क्लबला दररोज यायचं ठरवते आणि येणं काही होत नाही. पण उद्यापासून मात्र अगदी नक्की येईन गं… बघ हं, नाही आलीस तर आता पार्टीच घेईन तुझ्याकडून… हो गं हो, उद्या नक्की येते असं म्हणत राधानं फोन बंद केला. तेवढ्यात पुन्हा फोनची रिंग वाजली.
हॅलो ताई, अहो पेपरला बरेच दिवसात तुम्ही लेख पाठवला नाही… आज पाठवताय ना? दैनिक जागरण वृत्तपत्राच्या ऑफिसमधून फोन आला. अहो सर, गेले काही दिवस इतर कामात इतकी व्यग्र होते की, लेखन करायला वेळच मिळाला नाही. उद्या शनिवार आहे ना… उद्या नक्की पाठवते. मनात म्हटलं ’न कर्त्याचा वार शनिवार. असं नको व्हायला…’ असं म्हणून फोन ठेवला. मी राधिकावर हास्य क्लबला येत नाही म्हणून नाराज झाले. पण माझ्याही बाबतीत अशीच चालढकल चाललीय की…! पूर्वी दर आठवड्याला एक लेख वृत्तपत्राला पाठवत असे, पण… आज नाही लिहायला वेळ, उद्या नक्की लिहायला बसू , असं उद्या उद्या म्हणत माझंही काहीतरी कारणं शोधणं चालूच आहे. हा ’उद्या’ काही लवकर उगवत नाही. आपल्यापैकीदेखील अनेक जणांचं असं होतं ना? एखाद्या गोष्टीसाठी उगाचच चालढकल आपण करत असतो. त्याबाबतीत आपण अगदी हुशार असतो. खरंतर ती गोष्ट अगदी साधी असते. सहज जमण्यासारखी असते. आपल्याला करणंही शक्य असतं. मनावर घेतलं तर ती गोष्ट अगदी कमी वेळात होणारीदेखील असते.. पण.. आपणच ’आज नको उद्या नक्की करू’ असं मनाशी म्हणत या ’उद्याचे’ मात्र उगाचच लाड करतो. अनेक सबबी नावाचे मित्र एका हाकेवर उभे असतात. वृत्तपत्रात वीणा वर्ल्डच्या संचालिका वीणा पाटील यांनी ’जीवनोत्सव’ या सदरात एक अतिशय छान लेख लिहिला होता. त्यातलंच वाक्य मला खूप आवडलं… नेपोलियन बोनापार्ट म्हणतात की, आपण नेहमी उठतो त्यापेक्षा दोन तास जर आधी उठलो तर आयुष्यातली जागेपणाची दोन वर्षं वाढवू शकतो. आणि ते अगदी खरं आहे. मनात आलेलं काम, कल्पना, विचार काहीही असो, ते जर लगेचच केलं तर नक्कीच आपल्याला जागेपणातली काही वषर्ं बोनस म्हणून मिळतील.. माझी भाची अनु.. जवळजवळ चार वर्षांनी परदेशातून इंडियात नाशिकला आली. तिला भेटायला आज जाऊ, उद्या जाऊ असं म्हणत, शेवटी ती परदेशी पुन्हा निघून गेली तरी माझं तिला भेटायला जाणं झालं नाही… नंतर मला इतकं वाईट वाटलं, पण काहीच उपयोग नव्हता. दैनंदिन जीवनात अशा कितीतरी गोष्टींचा अनुभव घ्यायला आपण मुकत असतो. म्हणूनच ’वेळीच घातलेला एक टाका पुढील अनेक टाक्यांना वाचवतो’ असं म्हणतात. ’आज, आत्ता, ताबडतोब’ न्यायानं कोणताही निर्णय घेतला तर बरीच कामं सोपी व यशस्वी होतात. तशी आपल्याला सवयदेखील लागते.
निसर्गाचंच आदर्श उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्या मनाला कामं वेळेवर व नियमित करण्याची सवय लावली तर खरंच जीवनात आनंद निर्माण होईल… सूर्यानं जर ठरवलं मी रोज रोज कशाला उगवायचं? मी आज नाही उगवत. उद्या नक्की उगवीन… चंद्रानं ठरवलं ’मी दर पौर्णिमेला का बरं उपस्थित राहायचं? मला खूप कंटाळा आलाय. मी पुढच्या पौर्णिमेला उपस्थित राहीन.’ किंवा नदी म्हणाली,
’मला वहायचा खूप कंटाळा आलाय. आज थोडी विश्रांती घेऊया.’ चालेल का? निसर्गाचं हे चक्र अविरत चालू आहे. झाडं-वेलींचं फुलणं,
सूर्योदय, सूर्यास्त, त्यांच्या वेळा, ऋतुचक्र अखंडित चालू आहे. तिथे उद्या शब्द चालणारच नाही. हाच निसर्गाचा आदर्श जर माणसानं डोळ्यासमोर ठेवला तर आपण जीवनातल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू. आपल्या आळशी प्रजेला कामाला प्रवृत्त होण्यासाठी धडा शिकवावा म्हणून राजाने केलेली युक्ती ही गोष्ट माहीत असेलच…. एक दिवस राजा दवंडी पिटवतो ’मारुती मंदिराच्या मागील आंब्याच्या झाडाच्या आसपास सोन्याच्या नाण्यांचा रांजण जमिनीत पुरला आहे. जो कोणी शोधून मला पहिल्यांदा आणून देईल त्याला मी माझ्या राज्यातील प्रधानमंत्री करेन. ’गावातील आळशी लोक’ आज करू, उद्या करू’ असं म्हणत आळशीपणाने घरी बसून राहिले. रामू नावाच्या कष्ट करणार्या, प्रामाणिक माणसानं वेळ वाया न घालवता तो रांजण शोधून प्रथम राजाला नेऊन दिला. त्याचा प्रामाणिकपणा व कष्टाळू वृत्ती पाहून राजाने त्याची प्रधानमंत्री म्हणून नेमणूक केली. बाकीचे गावकरी मात्र आळशीपणामुळे ’चालढकल’ नावाच्या मित्राच्या प्रेमात पडले व आपलंच नुकसान झालं म्हणून हळहळत बसले. म्हणूनच आलेल्या संधीचा फायदा लगेचच घेतला तर…’दिल्ली बहोत दूर नहीं है’ असं म्हणायला हरकत नाही. कोणतीही गोष्ट मनावर घेऊन ते वेळेवर करणं याला ’पुट द डेट, डिसाईड द टाईम’ असं म्हणतात. कोणतंही चांगलं काम वेळेवर करणं यालाच ’शुभस्य शीघ्रम’ असं म्हणतात. ’इंटरव्ह्यू, परीक्षा केंद्र’ अशा ठिकाणी वेळेवरच पोहोचायला हवं. तिथं ’आज नको उद्या पोहोचू’ असं म्हणून चालेल का? संशोधन क्षेत्रात तर एक एक सेकंद महत्त्वाचा असतो. प्रत्येक सेकंदाला कृती करावीच लागते. उद्याची मोठमोठी स्वप्नं जरूर बघावी, पण त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी मात्र आज किंवा आत्तापासूनच सुरुवात केली तर विजय आपलाच आहे हे निश्चित.
आजची कामं आजच पूर्ण करायला हवीत. विद्यार्थ्यांनीदेखील आजचा होमवर्क आजच पूर्ण करण्याची सवय लावून घेतली तर त्यांना खेळण्यासाठी वेळ नक्कीच मिळेल. ’कल करे सो आज, आज अरे तो अब’ या मंत्राचा रियाज जर केलात तर यशाची नवनवीन शिखरं आपण नेहमीच सर करू शकू. सुप्रसिद्ध उद्योजक ’रतन टाटा’, ’बिर्ला समूह’, इन्फोसिसचे सर्वेसर्वा ’नारायण मूर्ती’ यांनी कल करे सो आज, आज करे सो अब’ याच मंत्राचा रियाज आयुष्यभर केला. अंबानी समूहाचे सर्वेसर्वा ’मुकेश अंबानी’ म्हणतात या सुप्रसिद्ध उद्योजकांच्या जीवनात उद्या या शब्दाला जागाच नाही. लगेच विचार, लगेच कृती व लगेच निर्णय हेच या सर्व उद्योजकांचं ब्रीदवाक्य आहे.’थिंक बिग, थिंक फास्ट, थिंक अॅक्ट’ हेच त्यांच्या यशाचं रहस्य आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या यज्ञात अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना प्रत्येक क्षणी कठोर शारीरिक यातना सहन कराव्या लागल्या. तिथे आज नको उद्या मी शिक्षा भोगीन, असं म्हणणं म्हणजे साक्षात मृत्यूलाच आमंत्रण होतं. सर्वच स्वातंत्र्यवीरांनी मनातील विचारांना लगेचच कृतीत आणलं. आणि आपल्या भारत मातेला ब्रिटिशांच्या त्रासातून मुक्त केलं. त्यांचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवून ’आज नको उद्या करू’ या वाक्याला मनात थारा न दिल्यास आजच्या या गतिमान जगाशी आपण सामना करत स्वतःला चांगल्या प्रकारे सिद्ध करू.
टाइम इज मनी किंवा थिंक फास्ट, अॅक्ट फास्ट या सूत्राचा जीवनात अवलंब केला तर विजय आपलाच आहे, असं समजायला हरकत नाही. कठोर श्रम, नियमित पणा, शिस्तप्रियता या सदगुणांना अंगीकारल्यास यशाची शिखरं आपण नक्कीच काबीज करू. मनात आलेल्या विचारांना लगेचच कृतीत आणलं तर बर्याच गोष्टी आपण आपल्या मनासारख्या करू शकतो. म्हणूनच आजारी व्यक्तींना भेटायला जाणं, सण, उत्सव, समारंभात एकमेकांना भेटणं, सांत्वनासाठी जाणं, यासारख्या गोष्टी लगेचच केल्या तर मनाला हळहळ वाटणार नाही किंवा पश्चातापही होणार नाही. आजचं काम उद्यावर ढकलायला आपण अनेक कारणं देण्यात अगदी हुशार असतो. बर्याच कामातून हळुवार अंग कसं काढून घ्यायचं? याबाबतीत देखील आपण अगदी हुशार असतो. म्हणूनच ’उद्या करू’ या वाक्यासाठी आपल्या मनाचं दार कायमच बंद करून ठेवूया. ’वेळ’ नावाची चंचल सौदामिनी कुणासाठी कधीच थांबणार नाही. म्हणूनच मुठीत आलेला क्षण अगदी घट्ट पकडून ठेवून त्या क्षणाचं सोनं लगेचच करूया. मग त्यासाठी कशाला उद्याची बात? बरोबर ना?…
Why talk about tomorrow?