सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक येथे आयोजित ’कृषी कुंभ’ प्रदर्शनाचा लाभ सिन्नर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांना घेता यावा, यासाठी तालुका कृषी विभागाने कंबर कसली आहे. 12 ते 15 मार्च या कालावधीत तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींमधील शेतकर्यांना प्रदर्शनास्थळी नेण्यासाठी विशेष बस वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून, यासाठी 36 अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या नियोजनानुसार, प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गावांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. 12 मार्च- 34 ग्रामपंचायती, 13 मार्च – 29 गावे, 14 मार्च – 28 ग्रामपंचायती, 15 मार्च – 23 गावांतील शेतकर्यांना प्रदर्शन बघण्याची संधी मिळणार आहे. या नियोजनामुळे तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकर्यांनाही आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि कृषी प्रदर्शनातील नवीन प्रयोगांची माहिती एकाच छताखाली मिळण्यास मदत होणार आहे.
प्रत्येक ’सजा’साठी स्वतंत्र जबाबदारी
प्रदर्शनासाठी जाणार्या शेतकर्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पास्ते, वडगाव सिन्नर, पांगरी, वावी, दोडी यांसारख्या विविध ’सजा’ अंतर्गत येणार्या गावांची जबाबदारी सहायक कृषी अधिकार्यांकडे सोपवण्यात आली आहे. संबंधित गावातील शेतकर्यांनी आपल्या भागातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी केले आहे. या प्रदर्शनात शेतकर्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाबरोबरच शेतीसाठी लागणारी विविध प्रकारची अवजारे, मशिनरी, अत्याधुनिक बी-बियाणे, खतांची माहिती मिळणार आहे.
Sinnar’s agriculture department is ready for ‘Krishi Kumbh’