* रस्ते, पाणीप्रश्नावरून नगरसेवक आक्रमक
* चार वर्षाचा मागितला लेखाजोखा
* ’मुकणे’वरून सिडकोचे नगरसेवक आक्रमक
नाशिक : प्रतिनिधी
प्रशासकीय राजवटीत शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे दुरापस्त झाले असून, सिडको, पंचवटी, नाशिकरोडसह सर्व ठिकाणी अपुरे व दूषित पाण्याचा पुरवठा होतो आहे. रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालून महापालिकेची फसवणूक करत आहेत. एमएनजीएल गॅस पाइपलाइनसाठी थेट मधोमध रस्ते खोदण्याचे पाप सुरू आहे. त्यामुळे याप्रकरणी पाणीपुरवठा व बांधकाम विभागातील संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी शुक्रवारी (दि. 6) महासभेत केली.
महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक महापालिकेची शुक्रवारी (दि.6) रस्ते, पाणी या विषयांवर विशेष महासभा बोलावण्यात आली होती. यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, नगरसचिव मदन हरिश्चंद्र आदी उपस्थित होते. दरम्यान, महासभा सुरू होताच संतप्त नगरसेवकांनी बांधकाम व पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराचा पुरता पंचनामा करीत सुरू असलेल्या गैरकारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
नगरसेविका प्रतिभा पवार यांनी सिडकोला मुकणे पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळते का? असा प्रश्न विचारताच सिडकोतील सर्व नगरसेवकांनी याबाबत प्रशासनाकडून माहिती हवी, अशी आक्रमक भूमिका घेतली. सिडकोला मुकणे योजनेतून का वगळले, असा प्रश्न भूषण राणे, किरण गामणे, मुकेश शहाणे, बंटी तिदमे यांसह इतर नगरसेवकांनी केला. महापौर आडके यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांना यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यास सांगितले. त्यावेळी मुकणेेच्या पहिल्या टप्प्यात 207 एमएलडीचे लक्ष्य असताना ते 137 एमएलडी क्षमतेनेच सुरू झाल्याने पाण्याचा हा ताण येत असल्याचे धारणकर यांनी सांगितले. सुधाकर बडगुजर म्हणाले, की 2015 ते 2020 पर्यंत स्मार्ट सिटीने साडेआठशे कोटींची कामे केली. त्यासाठी मनपाला अडीचशे कोटी रुपये द्यावे लागले. मात्र, स्मार्ट सिटीमुळे पाणीपुरवठा आराखड्याची (प्लॅन) रचना पूर्णपणे बदलून टाकली. पंचवटीत 71 एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना तेथे फक्त 44 एमएलडी एवढेच पाणी मिळते आहे. हीच बाब नाशिकरोड, सिडको व मध्य विभागात झाल्याचे ते म्हणाले. शहरात पाणीपुरवठ्याची समस्या कृत्रिमरीत्या आहे. महापालिकेने आउटसोसिर्ंगद्वारे व्हॉल्व्हमन घेतले आहेत. त्यांना राजकीय वरदहस्त असून, मनमानीप्रमाणे ते काम करत असल्याचा आरोप शाहू खैरे यांनी केला. समाधान देवरे यांनी प्रभाग 10 मधील नागरिकांना दूषित पाणी मिळत आहे. जाधव संकुलसह परिसरात पाण्याचा विषय गंभीर बनला असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी दूषित पाणीपुरवठा झालेल्या पाण्याची बाटली आपल्यासोबत आणली होती. पाणीपुरवठा अधीक्षक अभियंत्यांंना ती दाखवत त्यातून दुर्गंधी येते का नाही? ते सांगा, असे म्हणत त्यांच्याकडे ती बाटली दिली.
Panchnama of construction, water supply in the General Assembly