पारंपरिक विविध रहाडींमध्ये धप्पा मारत लुटला रंगोत्सवाचा आनंद
नाशिक : प्रतिनिधी
होळीनंतर दुसर्या दिवशी राज्यातील अनेक शहरांत धुळवड तथा धूलिवंदन खेळत एकमेकांना रंग लावण्याची परंपरा तथा प्रथा आहे. मात्र, नाशिक शहरात होळीनंतर पाचव्या दिवशी रविवारी (दि. 8) रंगपंचमी साजरी करून आबालवृद्धांनी या सणाचा आनंद लुटला. जुन्या नाशिक भागातील अनेक रहाडींत आणि रेन शॉवरखाली रंगाचा आनंद घेत नाशिककरांनी रंगपंचमी मोठ्या आनंदाने व उत्साहाच्या वातावरणात साजरी केली.
नाशिक शहरात रंगपंचमीनिमित्त पारंपरिक रहाडींमध्ये रंग खेळण्याची परंपरा आहे. या परंपरेचे मोठे आकर्षण नाशिकमधील नागरिकांबरोबर जिल्ह्यातील नागरिकांनादेखील आहे. पेशवेकालीन इतिहास असलेल्या नाशिक शहरात तिवंधा चौक, दिल्ली दरवाजा, शनी चौक, दंडे हनुमान, तांबट लेन, मधली होळी, साती आसरादेवी रहाड, राजेबहाद्दर लेन रहाड, अशा विविध आठ ठिकाणी साधारणपणे 25 बाय 25 आणि आठ फूट खोल अशा स्वरूपाच्या रहाडी आहेत. त्यात नागरिकांनी डुबकी मारून रंगोत्सवाचा आनंद लुटला. या रहाडीत वापरण्यात येणारा रंग हा पूर्णपणे नैसर्गिक स्वरूपाचा वापरला जातो. दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक मित्रमंडळांच्या वतीने रेन शॉवरची व्यवस्था करण्यात आली होती. यात मेन रोडवर गाडगे महाराज पुतळ्याजवळ राजेंद्र बागूल मित्रमंडळाने रेन शॉवरची मोठी तयारी केल्याने या ठिकाणी तरुणांनी गर्दी केली होती. तसेच श्री आझाद सिद्धेश्वर मंडळ, समस्त तुरेवाले पंच मंडळ यांच्या वतीने पेशवेकालीन रहाड, दिल्ली दरवाजा येथे रहाडीमध्ये आबालवृद्धांनी धप्पा मारत आनंद लुटला. छत्रपती शिवाजी महाराज रोड मित्रमंडळाच्या वतीने रेन शॉवर लावल्याने युवा वर्गाने रेन डान्स करीत सोहळ्याचा आनंद लुटला.
गणेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेलकम सहकार्य मित्रमंडळाने शॉवर डान्सची व्यवस्था केली होती. नगरसेवक शाहू खैरे यांच्या रोकडोबा मित्रमंंडळानेदेखील शॉवर डान्स आयोजित केला होता. श्री गजानन मित्रमंडळाच्या वतीने कार्यकर्त्यांनीदेखील रंगोत्सव साजरा केला.
यंदा तिवंधा चौक हिंदमाता सेवक मंडळ, काझीपुरा दंडे हनुमान मित्रमंडळ, जुनी तांबट लेन रहाड उत्सव समिती, मधली होळी तालीम संघ, दिल्ली दरवाजा, मेनरोड शिवसेवा मित्रमंडळ, भद्रकाली कारंजा नवजीवन मित्रमंडळ, श्री कानडे मारुती मित्रमंडळ, वावरे लेन छत्रपती शिवाजी महाराज रोड मित्रमंडळ, रोकडोबा मित्रमंडळ या मंडळांनी रंगपंचमी उत्साहात साजरी केली. घनकर लेन येथील नव प्रकाश मित्र मंडळ, मखमलाबाद. नाका मित्र मंडळ यासह विविध वीस ठिकाणी शॉवरचा रंगोत्सव साजरा करण्यात आला. यावर्षी नाशिकमध्ये नूतन मित्र मंडळ आणि काही ठिकाणी महिलांसाठी रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मिरजकर लेन, बुधवार पेठ या ठिकाणी सकाळी 11 वाजेपासूनच पाण्याचे शॉवर, रेन डान्स, कोरडा रंग याचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे महिलांनी या ठिकाणी आनंदाने उत्साहाच्या वातावरणामध्ये होळीचा आनंद लुटला. गेल्या काही वर्षांपासून रंगपंचमीला आधुनिकतेचा टच देण्यात येऊन शॉवर रंगोत्सव साजरा झाला.
जुने नाशिक परिसरात पारंपारिक रंगपंचमी उत्सवानिमित्त रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या परिसरातील रहदारी व भाविकांच्या वाहनांमुळे जुने नाशिक रहाड परिसरात प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते.
रहाडीची विधिवत पूजा
नाशिकची ऐतिहासिक ओळख असलेला आणि पेशवेकाळापासून जपलेला रहाड रंगोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा झाला. शहरात नऊ रहाडी असून, रविवारी दुपारी मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून या रहाडींत उडी घेऊन रंगपंचमीस सुरुवात झाली. यावेळी रंग, पाणी आणि तरुणाई विविध गाण्यांवर डीजेच्या तालावर थिरकताना दिसली. शहरातील विविध भागांत नागरिकांनी एकमेकांना रंग लावत, पाण्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी लहान मुलांपासून तरुणाईपर्यंत सर्वांनी रंगांच्या सरींमध्ये न्हाऊन निघत रंगपंचमीचा आनंद लुटला. शहरातील अनेक भागांत सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात रंगांची उधळण करण्यात आली.
सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर
शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता. याशिवाय रहाडींवर सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जात होती. रहाड आणि शॉवर डान्ससाठी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. रंगपंचमीच्या वेळी नाशिक पोलीस, स्वयंसेवक व दामिनी पथक गस्त घालत होते.
कोणत्या रहाडीत कुठला रंग?
यंदा खुल्या करण्यात आलेल्या राजेबहाद्दर लेनमधील रहाडीत केशरी, शनी चौकातील रहाडीत गुलाबी, दिल्ली दरवाजा केशरी, तिवंधा पिवळा, मधली होळी केशरी, तांबट लेन केशरी आणि दंडे हनुमान चौकातील रहाडीतील रंग पिवळा होता. या रहाडींत नैसर्गिक
फुलांपासून तयार केलेले रंग टाकण्यात आले. सर्व रंग विविध प्रकारच्या फुलांपासून तयार केले होते. हजारो नागरिक या रहाडींमध्ये डुंबण्याचा आनंद घेतला. रहाडीत जी उडी मारली जाते तिला ‘धप्पा’ म्हटले जाते. त्यात शनी चौक, दिल्ली दरवाजा, तिवंधा, मधली होळी, तांबट लेन, शिवाजी चौक व दंडे हनुमान चौक येथील रहाडींचा समावश आहे.
महिलादिनी महिलांचा रंगोत्सव
या रहाडींमध्ये नैसर्गिक फुलांपासून तयार केलेले रंग टाकण्यात आले होते. प्रारंभी हा रंग मोठ्या भांड्यांमध्ये उकळवण्यात आला. त्यानंतर तो रहाडींत टाकण्यात आला. रहाडींचे पूजन झाल्यानंतर परंपरेनुसार मानकर्यांनी प्रथम रहाडीत उड्या मारल्या. नंतर मग रहाडींत डुंबण्यासाठी एकच चढाओढ सुरू झाली. रंगपंचमी आणि महिला दिन एकाच दिवशी आल्याने जुनी तांबट लेन, मधली होळी आणि राजेबहाद्दर लेन येथील रहाडींमध्ये मानकर्यांनंतर सर्वप्रथम महिलांना डुंबण्यास प्राधान्य देण्यात आले. महिलांसाठी खास वेळ ठरवून देण्यात आली होती. ती वेळ संपल्यानंतर पुरुषांनी रहाडींमध्ये स्वतःला झोकून देण्यास सुरुवात केली.
Nashik residents get dressed up in colors on Rang Panchami