पुरोहित संघाच्या निवेदनानंतर गुन्हा दाखल
नाशिक : प्रतिनिधी
रंगपंचमी हा नाशिकचा आगळावेगळा उत्सव मानला जातो. याला कारण म्हणजे या शहरात असलेली रहाडींची परंपरा होय. या रहाडींमध्ये मनसोक्त डुबकी मारण्याचा आबालवृद्धांनी आनंद लुटला. आधुनिक पद्धतीने उभारलेल्या रेन शॉवर डॉन्समध्येही तरुणाईने डीजेच्या तालावर रंगपंचमीचा आनंद लुटला. मात्र, सायंकाळी चेहरा व अंगावरील रंग काढण्यासाठी गोदाघाटावर पाण्यात डुबक्या मारण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी तरुणांनी रंगाचा बेरंग करीत हुल्लडबाजी केली. वाईट गोष्ट म्हणजे, एकमेकांवर चपलांची फेकाफेकी करून, तसेच फाटलेले रंगीत कपडे फेकून सर्व गोदाघाट अस्वच्छ केला. गोदावरीचे पाणी प्रदूषित केले. अशा प्रकारे गैरवर्तनाचे प्रदर्शन केल्याने या गैरप्रकाराचा सर्वत्र निषेध होत आहे.
पुरोहित संघातर्फेदेखील यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. काही स्वयंसेवी व समाजसेवी संघटनांच्या वतीने या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, संध्याकाळी गंगा गोदावरी आरतीसाठी स्वयंसेवकांनी गोदा स्वच्छता मोहीम राबवली. त्यानंतर गोदामातेची आरती करण्यात आली. मात्र, गोदामातेला अशा प्रकारे प्रदीषित व अपवित्र करणार्या तरुणांवर कारवाईची मागणी होत आहे.
गोदाघाटावर विशेषतः रामकुंड परिसरात तरुणांकडून हुल्लडबाजी आणि स्टंटबाजीचे प्रकार वाढले आहेत. रंगपंचमीला गोदावरीत उड्या मारणे आणि चप्पल
फेकणे, तसेच सुरक्षारक्षक नसताना अस्वच्छता पसरवणे, अशा घटनांमुळे पवित्र गोदावरी नदीचे प्रदूषण होत आहे. धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. रंगपंचमीनंतर तरुण गोदावरीपात्रात अंघोळ करून रंग काढतात, ज्यामुळे पाणी प्रदूषित होते आणि परिसरात फाटके कपडे व चप्पलांचा खच पडतो. गोदाघाट व रामकुंड परिसरात सुरक्षारक्षक गायब असल्याने हुल्लडबाजांवर कोणतेही नियंत्रण राहत नाही. या बेजबाबदार वर्तनामुळे गोदापात्र प्रदूषित होत आहे.
पोलीस आयुक्त कर्णिक यांनी घेतली दखल
रंगपंचमीच्या दिवशी रामकुंड परिसरात काही हुल्लडबाजांकडून चप्पल फेकाफेकीचा प्रकार घडल्याची घटना समोर आली होती. या प्रकारामुळे पवित्र गंगा-गोदावरी नदीची विटंबना झाल्याची भावना व्यक्त झाली. गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देण्यात आले. पुरोहित संघाच्या निवेदनाची पोलीस आयुक्त कर्णिक यांनी तत्काळ दखल घेत पंचवटी पोलीस ठाण्याला आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानुसार संबंधित दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
गोदाप्रेमींचा इशारा
गोदावरी संवर्धन समिती आणि सुरक्षारक्षक केवळ नावालाच उरले आहेत. या हुल्लडबाजांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी गोदाप्रेमी संस्थेचे देवांग जानी यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Throwing of shoes in Godavari