दिंडोरी : प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील ओझर येथील खासगी दियान स्कूलच्या बसला सोमवारी (दि. 9) दुपारी एकच्या सुमारास सय्यद पिंपरीजवळ अपघात झाला. या अपघातात 21 विद्यार्थ्यांना सय्यद पिंपरीचे माजी सरपंच भाऊसाहेब ढिकले व परिसरातील शेतकर्यांनी धाव घेत बसमधील विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढल्याने अनर्थ टळला. विशेष म्हणजे या स्कूलबसचा चालक दारू पिऊन बस चालवत होता, असे अपघातस्थळी प्रत्यक्षदर्शनी सांगितले.
सविस्तर वृत्त असे की, निफाड तालुक्यातील ओझर येथील दियान युनिव्हर्सल स्कूलची बस (एमएच 15, ईएफ 0289) दुपारी एकच्या सुमारास विद्यार्थी सोडण्यासाठी निघाली; परंतु बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला दोन पलट्या खाल्याने अपघात झाला. परंतु आजूबाजूच्या शेतकर्यांनी ताबडतोब बसकडे धाव घेऊन तसेच सय्यद पिंपरीचे माजी सरपंच भाऊसाहेब ढिकले यांनी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. अपघातात दोन-तीन मुलांना मुका मार, तसेच कमरेला दुखापत झाल्याने पालकांनी दियान स्कूल बसचालक, स्कूल व्यवस्थापन व शिक्षकांवर संताप व्यक्त केला. दियान स्कूलच्या संबंधित चालकावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू व विद्यार्थी स्कूलमध्ये पाठवणार नाहीत.
यावेळी सय्यद पिंपरीचे माजी सरपंच ढिकले, जऊळके दिंडोरी ग्रामपंचायतीचे सदस्य कुणाल बागूल, पालक सचिन जोंधळे, नितीश कुमार, प्रवीण काळे, सचिन राजोळे, नामदेव ढिकले, गणेश जाधव आदी उपस्थित होते.
सय्यद पिंप्री रोडवरील अपघातात ज्या बसमध्ये दहा ते बारा विद्यार्थी बसण्याची परवानगी असतानाही 21 विद्यार्थी बसवूून आणले. बसचा चालक दारू प्यालेला असल्याने हा अपघात झाला. विशेष म्हणजे, अपघातानंतर माजी सरपंच ढिकले व शेतकर्यांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढले नसते, तर मोठा अनर्थ झाला असता. अनेक चालकांकडे परवाने नसतानाही बस चालवतात. शासनाने अशा स्कूलवर कारवाई करावी.
– कुणाल बागूल, ग्रामपंचायत सदस्य, जऊळके दिंडोरी
Fortunately, 21 students were safe in the bus accident.