हजारो झाडे जळून खाक; सोनांबे शिवारातील घटना, पाच हजार रोपे वाचली
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील सोनांबे शिवारातील आई भवानी डोंगरावर रविवारी (दि.8) दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्यात आल्याची घटना घडली. दुपारी कडक ऊन आणि जोरदार वार्यामुळे काही वेळातच आगीने विक्राळ रूप धारण केले. या आगीत हजारो झाडे जळून खाक झाली आहेत. डोंगरावरील जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच जय भवानी लॉन्सचे संचालक सोपान बोडके यांनी सोनांबे गावातील वृक्षप्रेमी मित्र तसेच सिन्नर शहरातील वनप्रस्थ फाउंडेशनच्या स्वयंसेवकांना कळवले. माहिती मिळताच स्वयंसेवकांनी तातडीने डोंगरावर धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुमारे दहा हजार पाचशे रोपांपैकी जवळपास पाच हजार रोपे वाचवण्यात यश आले.
वार्याचा वेग आणि तापमान अधिक असल्याने आगीचे लोळ झपाट्याने पसरले. या आगीत वनप्रस्थ फाउंडेशनने लावलेली सुमारे सहा हजार झाडे जळून गेली, तर वन विभागाच्या माध्यमातून लावण्यात आलेली सात हजारांहून अधिक झाडेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. याशिवाय डोंगरावर वास्तव्य करणारे अनेक लहान-मोठे कीटक, प्राणी व पक्षीही आगीत मृत्युमुखी पडल्याने जैवविविधतेची मोठी हानी झाली. आगीत वनप्रस्थ फाउंडेशनने झाडांसाठी बसवलेली संपूर्ण ड्रिप लाइन तसेच पाण्याची पीव्हीसी पाइपलाइनही जळून खाक झाली. त्यामुळे पुढील काळात डोंगरावरील झाडांना पाणी देण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, गेल्या नऊ वर्षांपासून वनप्रस्थ फाउंडेशनचे स्वयंसेवक, आई भवानी वृक्ष मित्रमंडळ तसेच सोनांबे गावातील नागरिक दररोज दोन तास श्रमदान करून डोंगरावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्य करत आहेत. त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे दहा हजार 500 रोपांची लागवड करण्यात आली असून, त्यांपैकी 95 टक्के झाडे जिवंत ठेवण्यात यश आले होते. मात्र, या आगीत जळालेली झाडे पाहून स्वयंसेवकांचे मन हेलावून गेले.
आग विझवल्यानंतर सर्व स्वयंसेवकांनी एकत्र येऊन झालेल्या नुकसानीची पर्वा न करता अधिक जोमाने वृक्षसंवर्धनाचे कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार केला. यावेळी राजेंद्र क्षत्रिय, अभिजित देशमुख, अनिल जाधव, समाधान बोडके, संदीप महावीर खिंवसरा, दत्तात्रय बोर्हाडे, विनोद रोकडे, किरण खिंवसरा, मनोज भंडारी, चंद्रभान वरुंगसे, राणू घोडे बाबा, धीरज बोडके, राहुल पवार, जगदीश बोडके, कुणाल बोडके, अभिषेक पवार यांसह अनेक स्वयंसेवक उपस्थित होते. सिन्नर नगरपरिषद तसेच मुसळगाव एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या व कर्मचार्यांनीही घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
Massive fire breaks out on Ai Bhavani hill