रंगोत्सवातील सामने पाहण्यासाठी आबालवृद्धांची प्रचंड गर्दी
येवला : प्रतिनिधी
रंगपंचमी उत्सवानिमित्त येवला शहरात ऐतिहासिक रंगांचे सामने अमाप उत्साहात झाले. ढोलताशाचा गजर अन् फटाक्यांची आतषबाजी करीत डीजे, हलकडीच्या तालावर ठेका धरत तरुणाईने बेधुंद होत रंगाची उधळण केली.
गेल्या शंभर ते दीडशे वर्षांची परंपरा जपत येवलेकरांनी रंगपंचमीचा आनंद लुटून शहरातील टिळक मैदान, तसेच डी. जे. रोड परिसरात रंगाचे सामने उत्साहात पार पडले. दरम्यान सकाळी आठपासून तर दिवसभर बच्चे कंपनी, नागरिक, युवक, महिलांनी रंगपंचमीनिमित्त एकमेकांवर विविध रंगांचा वर्षाव केला. शहरातील व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवून रंग खेळण्याचा आनंद लुटला. हा ऐतिहासिक रंगपंचमी उत्सव बघण्यासाठी पाहुणे मंडळी शहरात दाखल होऊन त्यांनीही विविध रंगाची उधळण केली. दिवसभर रंगोत्सवात येवलेकर न्हाऊन निघाले.
रंगपंचमी उत्सव समितीतर्फे सायंकाळी पाचला येवला शहरातील टिळक मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच युवा नेते कुणाल दराडे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर झळके, नगरसेवक गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत रंगाच्या सामन्याला प्रारंभ झाला.
रंगांचे सामने खेळण्यासाठी पन्नास ते साठ ट्रॅक्टरवर रंगाच्या ड्रमची व्यवस्था केली होती दुतर्फा ट्रॅक्टर समोरासमोर आल्यानंतर रंगोेत्सवाला प्रारंभ झाला. रंगमहोत्सव पाहण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी केली होती. इमारतीच्या गच्चीवरून महिला, नागरिक, रंगाचे सामने बघत होते. पाहुणे मंडळींनी हा रंगमहोत्सव बघून आनंद व्यक्त केला.
दुसरा सामना येवला शहरातील डी. जे. रोड येथे सायंकाळी सहाला सुरू झाला. युवा नेते कुणाल दराडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, माजी नगरसेवक संजय कुक्कर, सामाजिक कार्यकर्ते अविनाश कुक्कर, प्रभाकर झळके यांंच्या उपस्थितीत रंगाच्या सामन्याला प्रारंभ झाला. यावेळी दुतर्फा रंगाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून युवकांनी रंगाचा वर्षाव केला. यावेळी तरुणाईच्या अमाप उत्साहात हे सामने झाले. यावेळी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
रंगपंचमीनिमित्त सटवाई, वेताळाची मिरवणूक
येवला शहरात रंगपंचमीनिमित्त सायंकाळी परंपरेनुसार सटवाई आणि वेताळाची मिरवणूक काढण्यात आली. रंगांचे सामने खेळून झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ही मिरवणूक निघते. यंदा शहरातील सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाचे अविनाश क्षत्रिय यांनी वेताळाची वेशभूषा परिधान केली होती. अंगाला भस्म फासलेले, हातात शस्त्र आणि वेताळाचे रौद्र रूप धारण केलेले रूप मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. सटवाई माता की जयच्या जयघोषात मिरवणूक प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. येवला शहराला ऐतिहासिक वारसा असून, ही मिरवणूक गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. रंगांच्या या उत्सवाची भक्तिमय अन् पारंपरिक मिरवणुकीने सांगता झाली.
Youthful enthusiasm in Yewala