नाशिक : प्रतिनिधी
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या विक्रीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार किंवा व्यावसायिक वापर होऊ नये, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने 17 भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.
या पथकांपैकी दोन पथके जिल्हास्तरावर, तर 15 पथके तालुकास्तरावर कार्यरत असणार आहेत. ही पथके गॅस एजन्सींची अचानक तपासणी करून व्यावसायिकांना सिलिंडरचा पुरवठा होत नाही ना, तसेच घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत नाही ना, याची खात्री करणार आहेत.
केंद्र सरकारने व्यावसायिक गॅसच्या वापरावर निर्बंध आणल्यानंतर शहरातील गॅस वितरकांना कंपन्यांकडून व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. त्यामुळे वितरकांनीही हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, मेस तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सिलिंडर देण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे. परिणामी या व्यवसायांवर मोठा परिणाम झाला असून अनेकांचे कामकाज अडचणीत आले आहे. दरम्यान, व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध नसल्याने काही व्यावसायिक घरगुती गॅस सिलिंडर दुप्पट दराने खरेदी करण्यास तयार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे घरगुती गॅसचा काळाबाजार सुरू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी घरगुती सिलिंडर दोन ते अडीच हजार रुपयांना विक्री होत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचे वितरण सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव अशोक आत्राम यांनी राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकार्यांना दिले आहेत.
जिल्हास्तरावरील पथकांमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, पोलीस अधिकारी, वजन व मापे विभागाचे प्रतिनिधी तसेच इंधन कंपनीचे विक्री अधिकारी यांचा समावेश असणार आहे. ही पथके जिल्हाभरात कुठेही अचानक तपासणी करतील.
प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र अशी 15 पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांचे अध्यक्ष तहसीलदार असणार असून त्यामध्ये पोलीस अधिकारी, पुरवठा निरीक्षक, वजन व मापे विभागाचे अधिकारी आणि इंधन कंपनीचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. ही पथके संबंधित तालुक्यांमध्ये गॅस एजन्सी व वितरण व्यवस्थेची तपासणी करून नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवणार आहेत.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर बंदी आणल्याने आता गॅस एजन्सींची नियमित तपासणी अत्यावश्यक आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने जिल्हा स्तरावर दोन आणि तालुका स्तरावर प्रत्येकी एक अशी 15 पथके स्थापन केली आहेत. ही पथके नियमितपणे गॅस एजन्सींची तपासणी करतील.
– सीमा आहिरे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी
Gas shortage: Flying squads in Nashik; Gas agencies to be inspected