अंबडला अतिक्रमण पथकावर दगडफेक

औद्योगिक वसाहतीतील प्रकार

सिडको: विशेष प्रतिनिधी
अंबड औद्योगिक वसाहतीतील गरवारे टी पॉइंट ते एक्स्लोे पॉइंट या मुख्य रस्त्यावर अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर किर्लोस्कर कंपनीच्या नजीक असलेल्या रसवंतिगृह चालक व त्याच्या साथीदारांनी दगडफेक करून शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी (दि. 9) सायंकाळी घडली. वाहनप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रकरणी मनपाचे अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्‍याने अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस तपास सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंबड औद्योगिक वसाहतीतील गरवारे टी पॉइंट ते एक्स्लो पॉइंट या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने परिसरात वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहे. याबाबत नाशिक महापालिकेला अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने अखेर मनपा अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यालगत उभारलेल्या अनधिकृत छोट्या-मोठ्या दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले. या भागात रसवंतिगृह असल्यामुळे या ठिकाणी वाहने रस्त्यावर थांबवून ग्राहक रसपान करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याची तक्रार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार सिडको विभागाच्या अतिक्रमण पथकाने या ठिकाणी कारवाई करत रसवंतिगृहासमोरील खुर्च्या व इतर साहित्य जप्त केले.
या कारवाईदरम्यान संतप्त झालेल्या रसवंतिगृह चालकाने काही साथीदारांसह पथकातील कर्मचार्‍यांना भररस्त्यात शिवीगाळ करीत अरेरावी केली. त्यानंतर हातात दगड घेऊन अतिक्रमण विभागाच्या वाहनाकडे धाव घेत दगडफेक करण्यात आली. जप्त केलेले साहित्य परत न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, परिसरातील शिंदे गटाच्या एका नगरसेवकानेही घटनास्थळी येत संबंधित रसवंतिगृह चालकाच्या बाजूने उभे राहत मनपा कर्मचार्‍यांना दम दिल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अंबड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेनंतर संबंधित रसवंतिगृह चालकासह अन्य एका इसमाच्या विरोधात अतिक्रमण उपायुक्त दखणे यांच्या आदेशावरून अतिक्रमण पथकातील गाडीचालक निखिल तेजाळे यांनी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.
शहर व परिसरात होत असलेल्या अतिक्रमणामुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त होत असल्याने तसेच अतिक्रमणामुळे विविध ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असते.
यावर उपाय म्हणून महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या माध्यमातून अतिक्रमण हटविण्यात येत असताना महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह नगरसेवक त्यांना सहकार्य करत बळ देणे गरजेचे आहे. दुसरीकडे, हेच लोकप्रतिनिधी अतिक्रमण करणार्‍या दुकानदाराची बाजू घेत मनपाच्या कर्मचार्‍यांना बघून घेऊ, तुम्ही नोकरी कसे करतात ते मी बघतो, पुन्हा आमच्या भागातील अतिक्रमण काढायला आले तर याद राखा, अशा धमक्या देत असतील तर कर्मचार्‍यांनी कामे कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या नाशिक महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपासह मित्रपक्ष मनपाच्या माध्यमातून शहरात कामकाज करत असताना दुसरीकडे मात्र शिवसेना शिंदे गटाचे दोन वेळा निवडून आलेले नगरसेवक आपल्याच कर्मचार्‍यांना दमात घेत असतील तर कर्मचार्‍यांनी काम करायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप करणार्‍या त्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाविरोधात पक्ष प्रमुख उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, याकडे
महापालिका कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.

 

Stones pelted at encroachment squad in Ambad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *