नाशिकमध्ये ‘एबीबी’ करणार 200 कोटींची गुंतवणूक

भारतामध्ये ‘एबीबी’ची 680 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा

नाशिक : प्रतिनिधी
स्वित्झर्लंडस्थित जागतिक तंत्रज्ञान कंपनी एबीबी भारतातील संशोधन-विकास आणि उत्पादन क्षमतेच्या विस्तारासाठी सुमारे 75 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 680 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीत नाशिकमधील प्रकल्पासाठी सुमारे 200 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असून, त्यामुळे शहरातील औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना
मिळणार आहे.
कंपनीने देशातील बेंगळुरू, नाशिक, हैदराबाद आणि वडोदरा या चार प्रमुख औद्योगिक केंद्रांमध्ये उत्पादन आणि संशोधन सुविधा विस्तारण्याची योजना जाहीर केली आहे. त्यानुसार बेंगळुरूसाठी सुमारे 315 कोटी, नाशिकसाठी 200 कोटी, हैदराबादसाठी 110 कोटी आणि वडोदर्‍यासाठी 55 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या गुंतवणुकीद्वारे कंपनी भारतातील उत्पादन क्षमता वाढविण्याबरोबरच स्थानिक पातळीवर प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर
देणार आहे.
नाशिकमधील विद्यमान उत्पादन केंद्राचा विस्तार करण्यात येणार असून, इनडोअर आणि आउटडोअर सर्किट ब्रेकरच्या उत्पादनात वाढ केली जाणार आहे. याशिवाय, व्हॅक्युम इंटरप्टर उत्पादन सुविधेचा विस्तार करण्यात येणार असून, 33 केव्ही प्राथमिक गॅस-इन्सुलेटेड स्विचगियर आणि नव्या एसएफ-6 मुक्त तंत्रज्ञानाच्या स्थानिकीकरणालाही चालना मिळणार आहे. त्यामुळे ऊर्जा वितरण आणि औद्योगिक पायाभूत सुविधांसाठी आवश्यक उपकरणांच्या उत्पादनात वाढ होणार आहे.
या गुंतवणुकीमुळे भारतातील ऊर्जा क्षेत्र, मेट्रो रेल्वे, डेटा सेंटर्स आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला बळ मिळणार आहे. तसेच अभियांत्रिकी, ऑपरेशन्स आणि संशोधन क्षेत्रात सुमारे 300 पेक्षा अधिक कुशल रोजगार निर्मिती होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, भारतातील वाढती ऊर्जा मागणी, ग्रीड आधुनिकीकरण आणि पायाभूत सुविधांच्या जलद विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही गुंतवणूक महत्त्वाची ठरणार आहे. मेक इन इंडिया उपक्रमालाही या विस्तारामुळे चालना मिळेल, असे कंपनीकडून सांगण्यात
आले आहे.

नवीन उद्योग येण्यासाठी शहरातील औद्योगिक संस्था प्रयत्नशील होत्या. त्या प्रयत्नांना आता सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. एबीबी कंपनी 200 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे नाशिक शहरात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. – आशिष नहार, निमा अध्यक्ष

ABB to invest Rs 200 crore in Nashik

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *