‘एसीई गॅसेस टेक्नॉलॉजीज’ दिंडोरीत करणार 750 कोटींची गुंतवणूक

राज्यात 44 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार

नाशिक : प्रतिनिधी
‘एसीई गॅसेस टेक्नॉलॉजीज’ दिंडोरीत 750 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याने नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ प्रमुख कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून, या करारांमुळे राज्यात एकूण सुमारे 44 हजार 710 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या गुंतवणुकीमधून सुमारे सात हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या करारामुळे औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, राज्यातील विविध शहरांमध्ये नवीन प्रकल्प उभारले जाणार आहेत.
या गुंतवणुकीचा लाभ नाशिक जिल्ह्यालाही मिळणार आहे. औद्योगिकदृष्ट्या वेगाने प्रगती करत असलेल्या नाशिकमध्ये विविध क्षेत्रांतील कंपन्या गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामध्ये एसीई गॅसेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून दिंडोरी येथे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्रकल्पासाठी सुमारे 750 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे आरोग्य क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या औद्योगिक व वैद्यकीय वायूंच्या उत्पादनाला चालना मिळणार असून, स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत. तसेच टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीकडून एरोस्पेस व संरक्षणसंबंधित साहित्य निर्मितीसाठी सुमारे 4800 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक प्रस्तावित आहे. नागपूर, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये या प्रकल्पाचा विस्तार होणार असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनामुळे या क्षेत्रात नव्या संधी निर्माण होणार आहेत. जागतिक स्तरावर कार्यरत असलेली एबीबी ही कंपनीदेखील नाशिकमध्ये सुमारे 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. या प्रकल्पामुळे इलेक्ट्रिकल क्षेत्राशी संबंधित उत्पादनाला चालना मिळणार असून, स्थानिक उद्योगांसाठीही नवे सहकार्याचे मार्गखुला होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती, उत्तम दळणवळण व्यवस्था, मुंबई-नाशिक महामार्ग, समृद्ध कृषी व औद्योगिक पार्श्वभूमी तसेच उपलब्ध कुशल मनुष्यबळ यामुळे मोठ्या कंपन्यांचे लक्ष या भागाकडे वेधले जात आहे. आगामी काळात आणखी उद्योग येथे येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असल्याने जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला निश्चितच गती मिळणार आहे. नव्या उद्योगांमुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. औद्योगिक गुंतवणूक वाढल्यामुळे नाशिकचा औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे उल्लेख होईल. त्यामुळे ही बाब नाशिकसाठी अत्यंत आनंदाची आहे.
– आशिष नहार, अध्यक्ष, निमा
या गुंतवणुकीमुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळणार असून, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. परिणामी, औद्योगिक विकासाला नवीन दिशा मिळेल.
– राजेंद्र पानसरे, अध्यक्ष, आयमा

ACE Gases Technologies to invest Rs 750 crore in Dindori

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *