निफाडला माकडबाबा चौक परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई

छोट्या दुकानदारांचे नुकसान; पर्यायी जागेची मागणी

निफाड : प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती असलेल्या माकडबाबा चौक परिसरातील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर अखेर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करत जेसीबीच्या सहाय्याने अवैध बांधकामे हटवली. न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी सकाळी सुमारे दहाच्या सुमारास नगरपंचायत कर्मचार्‍यांनी पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबवली.
माकडबाबा चौक परिसरात अनेक वर्षांपासून अतिक्रमणाचा प्रश्न प्रलंबित होता. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर नगरपंचायतीने जेसीबी व ट्रॅक्टरच्या मदतीने धडक कारवाई करत रस्त्यालगत उभारलेली अवैध बांधकामे हटवली. या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक अडथळे दूर करण्याचा प्रशासनाचा
प्रयत्न आहे.
मात्र, अचानक झालेल्या या कारवाईमुळे छोट्या दुकानदारांमध्ये काही प्रमाणात घबराट पसरली. अनेक दुकानदारांचे सामान व शेड्स हटवण्यात आल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. प्रभावित दुकानदारांनी प्रशासनाकडे पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
शांतिनगरपासून पंचायत समितीपर्यंत मार्ग शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक मानला जातो. या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत होती. त्यामुळे केवळ न्यायालयाच्या आदेशाची वाट न पाहता संपूर्ण शहर अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यावर भर
न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील मुख्य रस्ते आणि चौक वाहतूक कोंडीमुक्त करणे ही प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे नगरपंचायत प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या अतिक्रमणांवर आगामी काळातही कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

 

 

Anti-encroachment action in Makadbaba Chowk area of ​​Niphad

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *