विद्युत रोषणाई, गर्दीने फुलला रमजान बाजार

वडाळागाव : प्रतिनिधी
रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सारडा सर्कल ते दूधबाजार परिसरात नगरसेवक सुफी जीन यांनी आयोजित केलेले ‘सुफी जीन रमजान बाजारचे उत्साहात उद्घाटन झाले. उद्घाटनावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उद्घाटनानंतर करण्यात आलेल्या आकर्षक आतषबाजीचे क्षणचित्र व सेल्फी पॉइंट मोबाइलमध्ये टिपण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ पाहायला मिळाली. रमजान महिन्यात इफ्तारसाठी व ईदकरिता लागणार्‍या विविध वस्तू नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या विशेष बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. बाजारात खजूर, शरबत, फळे, फराळाचे पदार्थ, तसेच इफ्तारसाठी लागणारे विविध पारंपरिक खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याशिवाय कपडे, बांगड्या, अत्तर, टोपी तसेच गृह सजावटीचे वस्तू आणि रमजान विशेष वस्तूंचे अनेक स्टॉलही येथे लावण्यात आले आहेत.
बाजार परिसरात आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आल्याने संपूर्ण परिसर सणासुदीच्या वातावरणाने उजळून निघाला आहे. रमजानमुळे संध्याकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, कुटुंबासह येथे भेट देणार्‍यांची संख्या वाढत आहे. या रमजान बाजारामुळे परिसरातील सर्वधर्मीय छोट्या व्यापार्‍यांना व्यवसायाची संधी उपलब्ध झाली असून, स्थानिक तरुणांनीही बाजाराच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला आहे. रमजान काळात हा बाजार रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असून, त्यामुळे रमजानच्या परंपरा, संस्कृती आणि सणाचा उत्साह अधिक खुलून दिसत आहे.

Electric lighting, crowded Ramadan bazaar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *