मनपाचे पोलिसांच्या वेतनाला फाटक

अडीच कोटी थकीत; पोलीस आयुक्तालयाचे पत्र, अतिक्रमणमध्ये कर्मचारी कार्यरत

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी नाशिक महापालिकेने पोलीस प्रशासनाकडून कायमस्वरूपी पाच पोलिसांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी अतिक्रमणच्या ताफ्यात दहा पोलीस कर्मचारी असताना ती आता पाचवर करण्यात आली आहे. दरम्यान, अतिक्रमण मोहिमेत कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांचे तब्बल अडीच कोटी रुपयांचे वेतन थकल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. वेतनासंदर्भात हालचाल होत नसल्याचे पाहत पोलीस प्रशासनाने पालिकेला पत्र पाठवत तात्काळ वेतन देण्याची मागणी केली आहे.
महापालिकेला अतिक्रमण मोहिमेसाठी मदत व्हावी, याकरिता अतिक्रमण विभागाकरिता मनपाने दहा ते बारा वर्षांपूर्वी कायमचे पोलीस मनुष्यबळ आपल्याकडे घेतले आहे. या पोलीस कर्मचार्‍यांचे वेतन पोलीस प्रशासनाकडूनच होते, मात्र पोलीस कर्मचार्‍यांची रक्कम पालिकेला पोलीस आयुक्तालयात जमा करणे गरजेचे आहे. परंतु, याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र असून, पोलीस कर्मचार्‍यांच्या वेतनाची रक्कम अडीच कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहे. शहराचा विस्तार गेल्या काही वर्षांत कमालीचा वाढत असून, दुसरीकडे ठिकठिकाणी अतिक्रमणही डोके वर काढत आहे. शहरात फुटपाथबरोबरच पक्के अनधिकृत अतिक्रमण उभे राहिले असून, अशा ठिकाणी कारवाई करण्यासाठी अतिक्रमणला सोबत पोलीस कर्मचार्‍यांची आवश्यकता भासते. प्रशासनाने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या द़ृष्टीने शहरातील अतिक्रमणे हटवण्यावर जोर असून, हातगाड्यांसह फुटपाथवर व्यवसाय करणार्‍यांवर दररोज कारवाई सुरू आहे. शहरात मोठी कारवाई असेल तर पालिकेला पोलीस कर्मचार्‍यांंची अधिकची कुमक मागावी लागते. जसे की, पालिकेने यापूर्वी रिपाइं नेते प्रकाश लोंढे यांचे अनधिकृत बांधकामासह मिलिंदनगर येथील 28 पक्की घरे जमीनदोस्त केली. त्यावेळी पोलिसांची वाढीव कुमक घेण्यात आली होेती. अतिक्रमणावर कारवाई करताना अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस प्रशासनाने दिलेल्या पोलिसांची मदत होते.

कार्यवाही सुरू

पोलीस प्रशासनाचे पत्र काही महिन्यांपूर्वी धडकल्यानंतर जागे झालेल्या पालिका प्रशासनाने थकीत रक्कम देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अडीच कोटींपैकी एक कोटी रक्कम अदा केली जाणार आहे.

Municipal Corporation cuts police salary

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *