जुने सिडकोत समाजकंटकांचा हैदोस; चारचाकी वाहनांची तोडफोड

लाकडी दांडके, दगड-विटांनी हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुने सिडको परिसरातील महात्मा फुले गार्डन चौक परिसरात गुरुवारी (दि. 12) रात्री अज्ञात समाजकंटकांनी उघडपणे दहशत माजवत दोन ते तीन चारचाकी वाहनांची तोडफोड केली.
रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा अंबड पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने चार ते पाच अल्पवयीनांसह एकास ताब्यात घेतले आहे. अधिक माहिती अशी की, पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके, दगड, विटा तसेच पेव्हर ब्लॉकच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या आलिशान चारचाकी वाहनांवर हल्ला चढवून त्यांची तोडफोड केली. त्यानंतर गल्लीबोळात शिरून घरांसमोर उभ्या असलेल्या दुचाकी वाहने पाडत नागरिकांना शिवीगाळ करत धमकावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
या परिसरातील सीसीटीव्ही
फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र, वाहन तोडफोडीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, जुने सिडको परिसरात वाहन तोडफोडीची ही तिसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार घडणार्‍या अशा घटनांवर कठोर कारवाई करावी तसेच रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Anti-social elements rampage in old CIDCO; Four-wheelers vandalized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *