नाशिक : प्रतिनिधी
फळे ही शरीरासाठी आरोग्यदायी असल्याने सर्व ऋतूमध्ये त्या त्या ऋतूत येणारी फळे खाण्याकडे नागरिकांचा कल असतो. मात्र नेहमीचेच ठराविक फळे
खाण्याऐवजी वेगळ्या चवीची फळे चाखण्यासाठी उन्हाळ्याची वाट पाहिली जाते. उन्हाळ्यात येणारा रानमेवा हा अबालवृध्दांना आवडतो. कोरोनामुळे मागील दोन वर्ष रानमेवा जास्त प्रमाणात विक्रीसाठी नव्हता. मात्र यंदा सर्व सुरळीत असल्याने रानमेवा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाला आहे. डोंगावरची काळी मैना आली हो…! म्हणले की लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजन रानमेवा खरेदी करतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरूवात झाली की रानमेव्याची आतुरने वाट पाहण्यात येते. रानमेव्याच्या तृप्त करणार्या चवीने नागरिकही मोठ्या प्रमाणात रानमेवा खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. शहरातील विविध परिसरात असलेल्या बाजारपेठेत रानमेवा विक्रीसाठी आला आहे. यात करवंदे, बोखरू, भोकरे,टेंभरे,जांभूळ,जंगली आवळा,आम्हुणा,बेमफुले या प्रकारचा रानमेवा विक्रीसाठी आला आहे. त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण,दिंडोरी या तालूक्यातील डोंगराळ परिसरातून रानमेवा नाशिक शहरात विक्रीसाठी आणला जातो. आदिवासी बांधवाकडून जंगल खोर्यातून रानमेवा शहरात विक्रीसाठी आणला जातो. यातून त्यांना उदनिर्वाहाचे साधन मिळते. पुर्वी ग्रामीण भागातील, पाड्यावस्त्यावर राहणार्यांकडून रानमेवा चवीने चाखला जात असे. मात्र आता शहरी भागातील नागरिकांनाही रानमेव्याची भुरळ पडल्याचे चित्र आहे. रानमेवा हा उन्हाळ्यात विक्रीसाठी येत असल्याने नागरिकांकडून दर उन्हाळ्यात आवर्जून रानमेवा चाखण्यात येतो. मात्र रानमेव्याची चव जशी वेगळी तशी विक्रीची पध्दतही वेगळी एक ग्लास करवंदे 10 ते 15 रूपये तर प्रतिकिलो 120 ते 130 रूपये असा करवंदाचा भाव आहे.