रविवार कारंजाचे रूपडे खुलणार

नाशिक : प्रतिनिधी


महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून आयुक्त रमेश पवार यांनी शहरातील वाहतूक बेटे तसेच अतिक्रमणांकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली असून, रविवार कारंजा येथील वाहतूक बेटाच्या दुरुस्ती व रंगरंगोटीच्या कामाला सद्या वेग आला आहे. त्यामुळे लवकरच रविवार कारंजाचे रूपडे खुलणार आहे.
रविवार कारंजा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात मोडतो. याठिकाणी असलेल्या वाहतूक बेटामध्ये गेल्या काही दिवसांपासून केर कचरा तसेच घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले होते. नाशिक ही सिंहस्थ कुंभनगरी असल्याने या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्याला अनुसरून गरुडाची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत महापालिकेने लक्षच न दिल्याने रविवार कारंजावरील वाहतूक बेटाला अवकळा प्राप्त झालेली होती. आता गेल्या काही दिवसांपासून या प्रतिकृतीला रंगरंगोटी करण्याबरोबरच वाहतूक बेटाचीही डागडुजी केली जात आहे. सद्या हे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. त्यामुळे लवकरच या वाहतूक बेटाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *