डॉ. अंबरीश चॅटर्जी यांच्यासह टीमची कामगिरी
नाशिक : प्रतिनिधी
एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये नुकतीच 16 वर्षांच्या मुलीवर गुंतागुंतीची समजली जाणारी मोठ्या यकृतातील गाठीची (लिव्हर ट्यूमर) यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया एसएमबीटी हॉस्पिटलचे कर्करोग शस्रक्रिया तज्ज्ञ डॉ. अंबरीश चॅटर्जी यांच्यासह त्यांच्या टीमने यशस्वी केली. या यशस्वी शस्रक्रीयेनंतर एसएमबीटी हॉस्पिटलमधील आधुनिक सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांची क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
अधिक माहिती अशी की, 16 वर्षांची अस्मिता (नाव बदललेले) हिच्या यकृतामध्ये सुमारे 12 सें.मी. आकाराची मोठी गाठ आढळून आली होती. ज्यामध्ये यकृतचे 2, 3 आणि 4 भाग समाविष्ट होते. बायोप्सी रिपोर्ट केल्यानंतर ही गाठ फोकल नोड्युलर हायपरप्लेशिया असल्याचे निष्पन्न झाले. लक्षणे आढळून आल्यामुळे कुटुंबीयांशी चर्चा करून शस्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. चॅटर्जी यांनी सांगितले. शस्त्रक्रिया अतिशय क्लिष्ट होती.
एसएमबीटी हॉस्पिटलचा मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबत गेल्या तीन वर्षांपासून तांत्रिक मार्गदर्शनाचा करार आहे. त्यामुळे या ठिकाणी उपलब्ध असलेले तज्ज्ञदेखील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून शिक्षण, प्रशिक्षण घेतलेले आहेत. डॉ. अंबरीश चॅटर्जी यांनीदेखील याच ठिकाणी शिक्षण घेऊन नाशिकमध्ये तब्बल 10 वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा देत आहेत. डॉ. चॅटर्जी यांनी सांगितले की, लहान वयात ट्यूमर किंवा इतर गंभीर आजार आढळण्यामागे आनुवंशिक कारणे, बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, पर्यावरणीय प्रदूषण आणि ताणतणाव ही कारणे असू शकतात. आधुनिक तपासणी तंत्रज्ञानामुळे आजारांचे निदान लवकर होत असून, उपचार तत्काळ सुरू करण्यास प्रारंभ झाला आहे. शरीरात यकृत आणि हृदय हे अतिशय जवळ-जवळ असते. यामुळे शरीरात रक्त संक्रमण करणार्या सर्व लहान-मोठ्या धमन्या या भागात असल्याने अधिक रक्तस्राव होतो. खूप बारकाईने या शस्रक्रिया केल्या जातात. या शस्रक्रियेसाठीही तब्बल 12 तासांपेक्षा अधिक वेळ लागला.
तसेच हॉस्पिटलमधील सुसज्ज ऑपरेशन थिएटर, आयसीयू आणि वॉर्डमधील प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ तसेच रेसिडेंट मेडिकल ऑफिसर्स यांनी शस्त्रक्रियेच्या आधी व नंतर महत्त्वाची भूमिका बजावली. एसएमबीटी हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सचिन बोरसे यांनी डॉ. चॅटर्जी आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये कर्करोगग्रस्त रुग्णांवर केमोथेरपी, सर्व प्रकारच्या कर्करोग शस्त्रक्रिया, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कार-टी सेल थेरपी, बाल-कर्करोग तपासणी व उपचार या ठिकाणी पूर्णवेळ केले जातात.
यकृतासारख्या अवघड अवयवांवरील मोठ्या शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी अनेक विभागांचे समन्वयाने काम करणे अत्यंत आवश्यक असते. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये 26 पेक्षा अधिक स्पेशालिटी आणि सुपरस्पेशालिटी विभाग एकाच छताखाली कार्यरत असल्यामुळे आणि योग्य वेळी योग्य विभागाची मदत मिळाल्यामुळेच ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
-डॉ. अंबरीश चॅटर्जी, कर्करोग शस्रक्रिया तज्ज्ञ, एसएमबीटी
A complicated surgery on a 16-year-old girl was successful at SMBT