मालेगावात मार्चमध्येच पारा 40 अंशांवर

सामान्य रुग्णालयात स्वतंत्र कक्ष; उष्माघाताचा एकही रुग्ण नाही

मालेगाव : प्रतिनिधी
उन्हाच्या प्रकोपामुळे तापमानात सातत्याने वाढ होत असून, मार्च महिन्यातच पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. दरवर्षी 43 अंशांपर्यंत तापमान गाठणार्‍या मालेगाव शहरात मात्र मागील तीन वर्षांत उष्माघाताचा एकही रुग्ण आढळून आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांकडून घेतली जात असलेली खबरदारी तसेच आरोग्य विभागाकडून करण्यात येणार्‍या जनजागृतीमुळे हा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तापमान 43.2 अंशांपर्यंत गेले होते. साधारण तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्यानंतर हवेतील आर्द्रता कमी होते. शुष्क हवा आणि प्रखर सूर्यकिरणांचा शरीरावर परिणाम होत असल्याने भर उन्हात घराबाहेर पडल्यास उष्माघाताचा धोका वाढतो. चक्कर येणे, मळमळ, उलटी होणे आणि अस्वस्थ वाटणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे आहेत. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना उष्माघाताचा त्रास प्रामुख्याने होतो.
संभाव्य धोका लक्षात घेऊन मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दरवर्षी उष्माघात उपचारासाठी स्वतंत्र कक्ष तयार केला जातो. यावर्षीही महिला, पुरुष व लहान मुलांसाठी दोन स्वतंत्र कक्ष तयार ठेवण्यात आले असून आवश्यक औषधे व साधनसामग्रीचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.नागरिकांकडून घेतली जाणारी खबरदारीही उष्माघात नियंत्रणात ठेवण्यास महत्त्वाची ठरत आहे. दिवसभर पुरेसे पाणी पिणे, लिंबूपाणी व नारळपाणी यांसारख्या द्रव पदार्थांचे सेवन करणे, बाहेर पडताना टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करणे तसेच दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे शहरात मागील तीन वर्षांत उष्माघाताचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही किंवा कोणाचाही बळी गेलेला नाही.

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

मालेगावमध्ये गेल्या काही वर्षांत उच्चांकी तापमानाचा पारा वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. 21 एप्रिल 2023 रोजी तापमान 43 अंश होते, तर 7 मार्च 2024 रोजी 43.6 अंशांपर्यंत पोहोचले. 19 एप्रिल 2024 रोजी तापमान 43 अंश नोंदविण्यात आले, तर 9 एप्रिल 2025 रोजी 43.9 अंशांपर्यंत पारा गेला होता. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

The mercury in Malegaon reaches 40 degrees in March itself.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *