नाशिककर कंपनीची मुंबईत मोठी झेप!

मिसिंग लिंकसाठी फोरकॉन इन्फ्राला कंत्राट

मुंबई : विशेष प्रतिनिधी
मुंबई या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पातील सर्वांत प्रतीक्षित ’मिसिंग लिंक’ अखेर पूर्ण होण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल पडले आहे. हे पाऊल उचलले आहे नाशिकच्याच एका कंपनीने! बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरळी येथील लोटस जेट्टी ते बडोदा पॅलेस या 320 मीटर प्रोमनेड व सायकल ट्रॅकच्या बांधकामाचे कंत्राट नाशिकस्थित फोरकॉन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बहाल केले आहे. कंत्राटाचे मूल्य दहा कोटी असून, हे बांधकाम सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.
’मिसिंग लिंक’ म्हणजे नक्की काय? मुंबई कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत प्रियदर्शनी पार्क (ब्रीच कँडी) ते वांद्रे-वरळी सी-लिंकच्या वरळी टोकापर्यंत एकूण 7.25 किलोमीटर लांबीचा भव्य प्रोमनेड उभारण्याचे नियोजन आहे. हा प्रोमनेड मुंबईच्या आयकॉनिक मरीन ड्राइव्हच्या तुलनेत दुप्पट म्हणजे 3.5 कि.मी. पेक्षा अधिक लांब आहे. या प्रोमनेडचे दोन प्रमुख विभाग- प्रियदर्शनी पार्क ते हाजी अली (2.75 कि.मी.) आणि बडोदा पॅलेस ते वरळी सीफेस (2.5 कि.मी.) आधीच जनतेसाठी खुले करण्यात आले आहेत. मात्र, लोटस जेट्टी ते बडोदा पॅलेस या 320 मीटरच्या तुकड्याला किनारपट्टी नियमन क्षेत्र (उठन) परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने तो भाग अपूर्ण राहिला होता.
फोरकॉन इन्फ्रा ः
नाशिकचा अभिमान
हे कंत्राट मिळविणारी फोरकॉन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातील हिलव्यू अपार्टमेंटमध्ये नोंदणीकृत आहे. ही कंपनी 11 एप्रिल 2007 रोजी स्थापन झाली असून, सध्या तिचे नेतृत्व पुंजाजी नाना सांगळे आणि अजय भाऊसाहेब सांगळे हे संचालक करतात. कपनीचा वार्षिक महसूल 100 ते 500 कोटींच्या दरम्यान आहे. रस्ते, महामार्ग, पूल आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये अनुभव असलेली ही कंपनी आता मुंबईच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाचा हिस्सा बनली आहे, हे नाशिककरांसाठी नक्कीच अभिमानाचे क्षण
आहेत.
जून 2026 पर्यंत पूर्ण होणार
लोटस जेट्टी ते बडोदा पॅलेस या स्ट्रेचचे बांधकाम जून 2026 पर्यंत पूर्ण होण्याचे लक्ष्य आहे. त्यानंतर हाजी अली ते लोटस जेट्टी या उर्वरित भागाचे कामही सुरू होईल, जे हाजी अलीच्या भूमिगत पार्किंगचे काम पूर्ण झाल्यावरच शक्य होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *