जातपंचायतीचा अजब निर्णय – विवाहितेस परस्पर घटस्फोट आणि भरपाई केवळ एक रुपया


जातपंचायतीचा अजब निर्णय – विवाहितेस परस्पर घटस्फोट आणि भरपाई केवळ एक रुपया
सिन्नर :
पहिल्या पत्नीला घटस्फोट न घेताच दुसरा विवाह करणे कायद्यात बसत नसले, तरी वैदू समाजाच्या जात पंचायतीने एका विवाहित महिलेलेला फोनवरुनच घटस्फोटाचा निर्णय कळवून तिच्या पतीने केलेल्या दुसऱ्या विवाहास मान्यता देऊन टाकली आणि सासरच्या मंडळींनी तिला भरपाई म्हणून केवळ एक रुपया पंचायतीकडे जमा केला.

सिन्नरमध्ये ही घटना घडल्याचे घडकीस आले असून, अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या मदतीने ही महिला जातपंचायत आणि पंचाच्या विरोधात लढण्यास सज्ज झाली आहे.

सिन्नर येथील अश्विनी या महिलेचे लोणी ( अहमदनगर) येथे लग्न झाले होते. लग्नानंतर सासरच्यांनी छळ केल्याने ती माहेरी सिन्नर येथे आली होती. याचा फायदा घेऊन सासरच्या लोकांनी लोणी व सिन्नर येथे वैदू समाजाची जातपंचायत बसवली. जातपंचायतीने या महिलेला काहीही न विचारता तिच्या अनुपस्थितीत घटस्फोट झाल्याचा निर्णय दिला. या घटस्फोटाची तिला भरपाई म्हणून
सासरकडील लोकांनी केवळ एक रुपया पंचांकडे जमा केला.

जातपंचायतीने सदर महिलेला पोलीस ठाण्यात जाण्यापासून रोखले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने न्यायालयीन प्रकियेत न्याय मागणे तिला अवघड गेले. आठ दिवसांपूर्वी तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न केल्याने तिला अन्याय असह्य झाला. सामाजिक कार्यकर्त्यामुळे ही बाब समोर आली आहे. न्यायालयाने घटस्फ़ोट दिला नसतांना पंचांच्या भूमिकेमुळे नवर्‍याने दुसरे लग्न केले. त्यामुळे जातपंचायतच्या पंचांचा विरोध मोडून काढत ती लढायला तयार झाली. जातपंचायतीचे पंच व सासरची लोक यांच्या विरोधात तक्रार करायला ती तयार झाली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जातपंचायत मूठमाती अभियानचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आणि अॅड रंजना गवांदे हे तिच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.


जातपंचायत मूठमाती अभियान
” राज्य सरकारने जात पंचायतच्या मनमानीला आळा घालण्यासाठी सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा करण्यात आला. परंतु, जातपंचायतच्या पंचाची दहशत समाजात अजूनही कायम आहे. प्रबोधनासोबत सदर कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्यास जातपंचायतींना मूठमाती देता येईल.”
– कृष्णा चांदगुडे,
राज्य कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *