ईद-उल-फित्रचा सण शहर परिसरात आज होणार साजरा

ईदगाह मैदानावर सकाळी दहा वाजता होणार सामुदायिक नमाज

जुने नाशिक : वार्ताहर
शव्वाल महिन्याचे काल सायंकाळी स्पष्ट चंद्रदर्शन घडल्याने ईद-उल-फित्रचा सण शहर परिसरासह जिल्ह्यात आज (दि. 21) साजरा करण्यात येणार आहे. ईदच्या सामुदायिक नमाजाचा मुख्य सोहळा गोल्फ क्लबवरील ऐतिहासिक शहाजहाँनी ईदगाह मैदानावर सकाळी दहा वाजता होणार आहे. तत्पूर्वी विविध मशिदींतून ईदची नमाज अदा केली जाणार आहे. दरम्यान, काल चांद रातच्या खरेदीसाठी येथील बाजारपेठेत मध्यरात्रीपर्यंत गर्दी झाली होती.
दरम्यान, चंद्रदर्शन घडण्यापूर्वीच काल सायंकाळपासून येथील दूधविक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणावर दूध घेण्यासाठी महिला व पुरुषांची मोठी गर्दी झाली होती. ईदच्या दिवशी दूध व ड्रायफ्रूटचा वापर करून प्रत्येक घरामध्ये शिरखुर्मा बनविण्याची परंपरा असल्याने दूध घेण्यासाठी अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. तसेच चंद्रदर्शन घडल्यानंतर चांदरातच्या खरेदीसाठी येथील भद्रकाली मार्केट, मेन रोड, दूध बाजार, दहीपूल, चौकमंडई, मुलतानपुरा, सुफी जीन बाजार आदी भागात खरेदीदारांची रात्री उशिरापर्यंत गर्दी झाल्याचे दिसून आले. याशिवाय, घरातील गॅस टाकी संपल्याने अनेक लोकांनी गॅस वितरकांकडे गॅसच्या टाकीची मागणी करण्यासाठी गर्दी
केली होती.
दरम्यान, ईदचा सण शहरातील मुस्लिम बांधवांनी धार्मिक पद्धतीने व शांततेत साजरा करावा. ईदची सामुदायिक नमाज ईदगाह येथे पठण करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन खतीब-ए-शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी केले आहे.
दरम्यान, ईदच्या दिवशी सुब्हान अल्लाही व बेहम्देही याचे तीनशे वेळा जप करावे, असे आवाहन मौलाना कारी रईस नुरी यांनी केले आहे. ईदच्या नमाजला जाताना व परत येताना वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करावा, जाताना व येताना गोरगरीब व गरजू लोकांची मदत करावी तसेच नमाजापूर्वी फितराची रक्कम अदा करण्यात यावी, असे आवाहन मौलाना इब्राहिम कोकणी यांनी केले आहे.
ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर शुभेच्छाफलक लावण्यात आले आहेत. शुभेच्छा देणार्‍यांमध्ये भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या मोठ्या पक्षांसह अनेक सामाजिक संस्थांच्या पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.

Eid-ul-Fitr festival to be celebrated in city areas today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *