ठेकेदारांशी वाद, अनियमिततेचे आरोप
नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे यांना पन्नास हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांच्या कामकाजावरील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. अटकेनंतर जिल्हा परिषद आवारात ठेकेदारांनी केलेल्या जल्लोेषातून त्यांच्या विरोधातील रोष स्पष्ट झाला.
ठाकरे यांच्या कार्यकाळात ठेकेदारांना कामांसाठी अडथळे निर्माण करणे, फायलींवर सहीसाठी वारंवार विलंब लावणे, तसेच पैशावरून वाद घालणे, अशा तक्रारी सातत्याने होत होत्या. काही प्रकरणांत ठेकेदारांना स्वाक्षरीसाठी बाहेर बोलावले जात असल्याचीही चर्चा होती. कामे मिळवून देण्याच्या बदल्यात अवाजवी पैशाची मागणी होत असल्याने ठेकेदारांमध्ये नाराजी वाढली होती. त्यामुळे टेंडर प्रक्रियेत अनियमितता करून सरकारी निधीचे साडेतीन कोटींचे नुकसान केल्याने त्या कामाचे फेरटेंडर करण्यात आले. या अनियमितेस कारणीभूत असलेल्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे यांच्या विरोधात जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे ठेकेदारांनीच या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पकडून दिल्याचे बोलले जाते. ठाकरे यांना रंगेहाथ पकडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या आवारात ठेकेदारांनी फटाके फोडून जल्लोष केला आणि भावनांना वाट करून दिली. जलयुक्त शिवार योजनेंंतर्गत सुमारे 16 कोटींच्या 58 कामांच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे उघड झाले होते. पात्र- अपात्र ठरविताना नियमभंग, तसेच निविदा समितीकडे फायली न पाठवता थेट निर्णय घेण्याचे आरोपही करण्यात आले. याप्रकरणी फेरनिविदा काढण्याची वेळ आली. मात्र, संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्याची खंत व्यक्त होत आहे.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांच्याकडे यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने तक्रारींवर तातडीने आणि कठोर कारवाई करून शिस्त व पारदर्शकता प्रस्थापित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
वैशाली ठाकरे प्रकरणात कॉल रेकॉर्डची छाननी सुरू
नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेत लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे आणि सहायक लेखाधिकारी अरुण धारणकर यांच्यावरील कारवाईनंतर तपासाला वेग आला आहे. दोघांना गुरुवारी (दि. 19) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.दुसर्या दिवशी शुक्रवारी (दि.20) न्यायालयात हजर करण्यात आले होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत सापळा रचून पन्नास हजारांची लाच स्वीकारताना जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे व सहायक लेखाधिकारी अरुण धारणकर यांंना पकडले होते.
या कारवाईनंतर ठाकरे यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यांच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे.
कॉल रेकॉर्डच्या तपासातून आणखी काही संबंधित व्यक्ती व आर्थिक व्यवहार उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर येथील एका ठेकेदाराने सिमेंटकाँक्रीट बंधारा दुरुस्तीची दोन कामे पूर्ण केली होती. या कामांसाठी सुमारे 16 लाख 19 हजार 290 रुपयांचे देयक मंजूर करण्यासाठी ठाकरे यांनी 72 हजारांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर पन्नास हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना अटक केली.
याप्रकरणी दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी करत आहेत.
Question mark over Thackeray’s administration after bribery case