नाशिकचा हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी!

अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडला केले पराभूत, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पहिलवान

पुणे :
पुण्यात वाघोली (ता. हवेली) येथे ‘महाराष्ट्र केसरी 2026’चा अंतिम सामना मोठ्या उत्साहात पार पडला. हा अंतिम सामना महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाला. यावेळी महेंद्र गायकवाडला हर्षवर्धन सदगीरने 4-2 ची आघाडी घेत पराभूत केले.
माती विभागाच्या अंतिम लढतीत सोलापूरचे महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीचे सिकंदर शेख यांच्यात सामना झाला. या लढतीत महेंद्र गायकवाडने 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. पहिल्या हाफच्या सुरुवातीलाच त्यांनी 2 गुण मिळवले आणि त्यानंतर आणखी 1 गुण घेत 3-0 अशी आघाडी घेतली. दुसर्‍या हाफमध्ये सिकंदर शेखने गुण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. त्यामुळे महेंद्र गायकवाडने हा सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. माती विभागाच्या अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखचा पराभव केला, तर गादी विभागाच्या अंतिम फेरीत हर्षवर्धन सदगीरने जय पाटीलला मात दिली. त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड आमनेसामने आले.महेंद्र गायकवाडने पहिल्या हाफमध्ये 1 गुण मिळवत आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर हर्षवर्धन सदगीरने 1 गुण मिळवत सामना बरोबरीत आणला. यानंतर, पहिला हाफ 1-1 अशा बरोबरीत संपला. दुसर्‍या हाफमध्ये महेंद्र गायकवाडला क्टिव्हिटी टास्क’ देण्यात आला, मात्र त्यात त्याला गुण मिळवता आले नाही. त्यामुळे हर्षवर्धन सदगीरला एक गुण मिळाला. पुढे हर्षवर्धनने आणखी दोन गुण मिळवत 4-1 अशी आघाडी घेतली. नंतर हर्षवर्धन सदगीर बाहेर गेल्यामुळे महेंद्र गायकवाड यांना एक गुण मिळाला. अखेर वेळ संपेपर्यंत हर्षवर्धन सदगीरने 4-2 अशा फरकाने विजय मिळवला.

सहा वर्षांनंतर डबल महाराष्ट्र केसरीचा बहुमान

पुणेनजीक वाघोली (ता. हवेली) येथे काल (दि. 22) झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंतिम लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावला. त्याने सोलापूरच्या महिंद्र गायकवाड याला चीत केले. विशेष म्हणजे, हर्षवर्धन सदगीर यांनी यापूर्वीही महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला आहे. सहा वर्षांपूर्वी सन 2020 मध्ये 63 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शैलेश शेळकेला हरवून हर्षवर्धन सदगीर हा महाराष्ट्र केसरी ठरला होता. त्यामुळे त्याला डबल महाराष्ट्र केसरीचा बहुमान प्राप्त झाला आहे.

बक्षिसांचा वर्षाव
हर्षवर्धन सदगीर फॉर्च्यूनर कार जिंकणारा पहिला महाराष्ट्र केसरी ठरला. महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा आणि 5 लाख रुपयांचा धनादेश अशी बक्षिसांची मोठी रक्कम मिळाली आहे.

भगूरमध्ये गिरवले धडे

‘डबल केसरी’ झालेला हर्षवर्धन मुकेश सदगीर याचे बालपण नाशिकजवळील भगूर येथे गेले. भगूरमधील स्वातंत्र्यसैनिक नरसिंहराव बलकवडे व्यायामशाळा हे त्याच्या मल्लआराधनेचे केंद्र ठरले. हर्षवर्धन सदगीरचे तसे मूळ गाव अकोले तालुक्यातील कोंभाळणे. वयाच्या दहाव्या वर्षी पाचवीत शिक्षण घेण्यासाठी कोंभाळणे येथून हर्षवर्धन भगूर येथे दाखल झाला.

Harshvardhan Sadgir of Nashik, Maharashtra Kesari!

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *