भोंदूबाबा अशोक खरातनेही म्हटले नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला!

सिडको : विशेष प्रतिनिधी
राज्यभर चर्चेत असलेल्या भोंदूगिरी प्रकरणात कॅप्टन अशोक खरात याच्यावर नाशिक पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कायद्यापुढे कुणी लहान किंवा मोठा नसून, कायदा सर्वांसाठी समान आहे, तसेच गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, असा ठोस संदेश या कारवाईतून नाशिक पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, अशोक खरात याचा पोलिसांनी बालेकिल्ला करत त्याच्या साम्राज्याला पोलिसी सुरुंग लावल्याचे बोलले जात असून, आगामी काळात अशोक खरात प्रकरणातील अन्य मोठे मासेदेखील गळाला लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
दुसर्‍यांचे भविष्य सांगण्याच्या नावाखाली भोंदूगिरी करत व्हीआयपी जीवन जगणारा तसेच राजकारणी व आयएएस-आयपीएस अधिकार्‍यांशी संबंध प्रस्थापित करून सरकारी यंत्रणेचा वापर केल्याचे आरोप असलेला अशोक खरात यानेही चौकशीदरम्यान नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे पोलिसांनी त्याच्याकडून वदवून घेतले.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात याच्याविरोधात एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली करत आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात पुरावे समोर आल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.
अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली. चौकशीदरम्यान आरोपीकडून तपासात अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीला विविध ठिकाणी नेऊन चौकशी केली. या दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे वदवून घेतले आहे. तसेच या संदर्भातील एक व्हिडिओही समोर आला असून, त्यातही याच आशयाचे वक्तव्य असल्याचे सांगितले जात आहे.
या कारवाईमुळे नाशिक पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका घेतल्याचे दिसून आले. विशेषतः भोंदूगिरीसारख्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी पोलिसांची ठाम भूमिका स्पष्ट झाली आहे.दरम्यान, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असा उल्लेख करत सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया उमटत असून, धन्यवाद नाशिक शहर पोलीस, आपण कायदा सर्वांना समान आहे याची प्रचीती दिली, अशा भावना नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. या प्रकरणामुळे कायद्याबाबतचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे मत व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी
करत आहेत.

Even the fraudster Ashok Kharat said that Nashik district is a stronghold of law!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *