दि. 28 फेब्रुवारीला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्त्रायलचे अध्यक्ष नेत्यानाहू यांच्या अविचारीपणामुळे आणि मग्रुरीमुळे इराणवर हल्ला केला. त्याला कारण दिले इराणकडे अण्वस्त्रे असल्याचे, मात्र खरे कारण अमेरिकेला इराणमधील सत्ता उलथवून टाकत तेलावर ताबा मिळवायचा आहे. पहिल्याच दिवशी इराणवर जोरदार हल्ला करून इराणच्या सर्वोच्च नेत्याची हत्या करून अनेक बड्या नेत्यांचीदेखील हत्या केली.
अमेरिकेला वाटले होते इराण लवकरच शरण येईल आणि आपले ईप्सित साध्य होईल; मात्र इराणने जोरदार प्रतिकार करत अमेरिका, इस्त्रायलच्या नाकात दम आणला आहे. आता जवळपास तीन आठवडे ऊलटूनदेखील इराण लढत आहे. मात्र, या युद्धामुळे जगाला वेठीस धरले गेले आहे. त्याचा विपरीत इंधन, गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. जागतिक पातळीवर इंधनाच्या किमती वाढल्या आहेत आणि पर्यायाने महागाई वाढत आहे. इराणने आखाती देशांतील अमेरिकन तळ असलेल्या दुबई, कुवेत, बहरिन, जॉर्डन, अबूधाबी अशा अनेक देशांवर हल्ले केले. यात मोठी जीवितहानी व वित्तहानी होत आहे. ऊर्जा क्षेत्रावर तर मोठा विपरीत परिणाम होत आहे. त्यातच इराणने हार्मुझ खाडी मार्ग बंद करून चांगलीच कोंडी केली आहे. केवळ चीन, रशिया यांच्या जहाजांची वाहतूक होत आहे. भारतातदेखील दोन जहाजे आली. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलू लागली आहे. मात्र, इराण अजूनही हार मानेल अशी चिन्हे दिसत नाहीत. केवळ ऊर्जा क्षेत्रावरच नव्हे तर इतर व्यापारावरदेखील परिणाम होत आहे. शांततेचे नोबेल पारितोषिक मिळविण्यासाठी अट्टहास करणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला अशांततेत ढकलले आहे.
या युद्धाचा जसा जगावर परिणाम झाला आहे, तसा तो भारतावरदेखील होत आहे. युद्ध सुरू होताच भारतात घरगुती गॅस 60 रुपयांनी तर व्यापारी गॅस 120 रुपयांनी वाढला. त्यामुळे इंधन तुटवडा होईल का, अशी शंका जनतेमध्ये निर्माण झाली, त्यात गॅस बुकिंगवर निर्बंध घातले गेले. सरकारदेखील याबाबत योग्य वस्तुस्थिती जनतेसमोर मांडत नाही. त्यामुळे पॅनिक वातावरण मोठ्याप्रमाणावर निर्माण झाले आहे. प्राइम पेट्रोलची किंमतदेखील वाढविण्यात आली आहे; मात्र अजून तरी पेट्रोलच्या किमती वाढल्या नाहीत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन इंधन दर वाढविले जात नाही, अशी जनतेची भावना आहे. युद्ध लांबल्याने आता दुष्परिणाम दिसू लागले आहेत; मात्र ये तो सिर्फ झलक है, असली पिक्चर बाकी है, अशी परिस्थिती आहे. पावसाळा सुरू झाला की, मोठ्याप्रमाणावर खतटंचाई जाणवणार आहे आणि त्याचा परिणाम शेतीवर होणे अटळ आहे. आखाती देशांतून येणारे परदेशी चलन यावर विपरीत परिणाम होणे निश्चित आहे.
त्याचबरोबर हजारो, लाखो नागरिक या देशातून परत येत आहेत. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहेच. इंधन टंचाईच्या झळा हॉटेल, लहान-मोठे कारखाने, उद्योग, लॉजिस्टिक कंपन्या यांना बसू लागला आहे आणि त्याचा परिणाम जनजीवनावर दिसू लागला आहे. अनेकांच्या नोकर्यांवर गदा येणार, उद्योगधंदे बंद होण्याची टांगती तलवार आहेच. ऊर्जा क्षेत्रावर तर मोठा विपरीत परिणाम होत आहे. याचा फटका वीजनिर्मिती, पुरवठा यालादेखील बसणे अपरिहार्य आहे. एकूणच येणारा काळ अमृतकाल नसेल तर संकटकाल असेल का?
The war dragged on – tensions increased.