भारतीय संस्कृतीत साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा सण हा हिंदू नववर्ष दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. या दिवशी विविध उपक्रम राबविण्यात येतात. घरोघरी गुढ्या, तोरणे उभारली जात असतानाच, गेल्या काही वर्षांपासून नाशिक शहरात नववर्ष स्वागतयात्रा काढण्याची परंपरा सुरू झाली आहे. यंदाही या नववर्ष स्वागतयात्रेने नाशिककरांमध्ये चैतन्य निर्माण केले. शहरात ठिकठिकाणी निघालेल्या या स्वागतयात्रांमध्ये आबालवृद्ध या अत्यंत उत्साहाने मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झाले होते. जय श्रीराम, जय हनुमान, हर हर महादेव, भारतमाता की जय अशा घोषणांनी शहर परिसर गुरुवारी सकाळी दुमदुमला होता. सकाळी सातच्या सुमारास शहराच्या विविध उपनगरांमधून गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्ष स्वागतयात्रांचा एकच वेळी प्रारंभ झाला. नागरिकांनीही त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. घरोघरी उभारण्यात आलेल्या आनंदरूपी गुढीमुळे शहरभरात चैतन्य अवतरले होते. घरोघरी गुढी उभारल्यानंतर विविध मंदिरांमध्येही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
पंचवटीतील श्री काळाराम मंदिर, श्री कपालेश्वर मंदिरासह जुनी मंदिरे आणि उपनगरांमधील विविध मंदिरांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त भाविकांची गर्दी दिसून आली. शहरासह उपनगरांत विविध संस्था-संघटनांतर्फे काढण्यात आलेल्या स्वागतयात्रांद्वारे भारतीय संस्कृतीची मूल्ये जपण्याचा व सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, मंडळे, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी यात्रांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात्रेतील पारंपरिक देखाव्यांनी लक्ष वेधून घेतले. युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शिष्टमंडळ, श्रीराम-लक्ष्मण-सीतामाता, खंडोबा महाराज, तसेच लहान मुलांनी श्रीकृष्ण-राधा यांच्या वेशभूषेत नोंदवलेला सहभाग लक्षवेधी ठरला. नववर्ष स्वागतयात्रा समिती नवीन नाशिक परिसरतर्फे आयोजित यात्रेत नागरिकांनी सहकुटुंब सहभाग नोंदवला. खुटवडनगर, पवननगर, मटाले चौक, आदर्शनगर, वनश्रीनगर आदी भागांतून सुरू झालेल्या सिडकोतील सर्व यात्रांचा कामटवाडेतील माऊली लॉन्स परिसरात एकत्र येऊन समारोप झाला. त्याप्रमाणे पंचवटीत श्री काळाराम मंदिर, मधुबन कॉलनी, रामवाडी, गणेशवाडी या भागातून स्वागतयात्रा निघाल्या. सातपूर, इंदिरानगर, मखमलाबाद, गंगापूररोड, रविवार कारंजा आदी ठिकाणी निघालेल्या स्वागतयात्रांमुळे शहरात चैतन्य अवतरले होते. तसेच नाशिकरोड येथील स्वागत यात्रेस मुक्तिधाम येथून सुरुवात झाली. देवळाली कॅम्प, भगूर परिसरातदेखील विविध उपक्रमांद्वारे गुढीपाडवा साजरा करण्यात उपनगरांतील नागरिकांनी
उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
जनकल्याण रक्तकेंद्रातर्फे महिला रक्तदात्यांचा गौरव
जनकल्याण रक्तकेंद्रातर्फे महिला दिनाच्या निमित्ताने वर्षभर रक्तदान करणार्या 168 महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सभागृहात सभागृहात महिलांना महिलाना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी सहकार्यवाह, जनकल्याण रक्तकेंद्र, डॉ. रश्मी दिवे यांनी महिलांच्या रक्तदानातील सहभाग वाढवण्यासाठी मिशन 5000 ही योजना राबविणार असल्याची माहिती दिली. या योजनेंतर्गत महिलांची सीबीसी तपासणी, आहार नियोजन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन करून त्यांना रक्तदानासाठी सक्षम करण्यात येणार आहे. तसेच 2026 मधील वाढदिवस रक्तदान करून साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सेवाभारती नाशिक ग्रामीणच्या उपाध्यक्षा ऋचा पंडित यांनी महिलांनी कुटुंबाबरोबरच समाजातही सक्रिय भूमिका बजावण्याची गरज व्यक्त केली.
सावित्रीमाई फुले महिला पुरस्कार वितरण सोहळा
सोशल इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेस्टिनीमार्फत आयोजित सावित्रीमाई फुले महिला पुरस्कार 2026च्या वितरण समारंभ झाला. सोहळ्याला महापौर हिमगौरी आहेर-आडके, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, सुरेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. गंगापूररोडवरील बाळासाहेब ठाकरे उद्यानात झालेल्या या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात शिक्षण, आरोग्य, सामाजिक सेवा, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या महिलांचा समावेश होता.
‘अंतर्नाद’मध्ये हजारो कलावंतांचा सहभाग
महापालिका आणि नववर्ष स्वागत समिती यांच्यातर्फे पंचवटीतील गौरी पटांगण येथे अंतर्नाद हा गायन, वादन व नृत्याचा अनोखा आविष्कार रंगला. तब्ब्बल 120 गुरुकुलातील एक हजार सातशे पंच्याऐंशी कलाकारांनी एकाच वेळी सादर केलेल्या या कलाविष्काराने गोदाकाठ भक्तिमय आणि संगीताच्या रंगात न्हाऊन निघाला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे तीनशे तबला वादक आणि शेकडो नृत्य-गायन कलाकारांचा ताळमेळ. तबला गुरू नितीन पवार आणि नितीन वारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य संगीत समन्वय साधला गेला. यामध्ये रूपक मैद, अमित भालेराव, रसिक कुलकर्णी यांच्या तीनशे शिष्यांनी तबल्याचा नाद घुमवला. वंदे मातरम् आणि श्रीराम वंदनेने कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात झाली.
गोदातीरी 15 हजार चौ. फुटांची महारांगोळी
हिंदू नववर्ष स्वागत महोत्सवानिमित्त नाशिक महापालिका व नववर्ष स्वागतयात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गोदातीर परिसरात पंच परिवर्तन हेच समाजपरिवर्तन या संकल्पनेवर आधारित भव्य महारांगोळी साकारण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमातून स्वबोध, सामाजिक समरसता, नागरिक शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन व पर्यावरण या पंचसूत्रीचा प्रभावी संदेश देण्यात आला. सुमारे 15 हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेली ही महारांगोळी तब्बल सव्वादोनशे महिलांनी एकत्र येऊन साकारली. या भव्य कलाकृतीसाठी अंदाजे 800 किलो रांगोळी व 2200 किलो रंगांचा वापर करण्यात आला. अवघ्या चार तासांत ही रांगोळी पूर्ण करण्यात आली. रंग, रचना आणि संदेश यांचा सुंदर मिलाफ या उपक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.
कर्तबगार सुप्रेम महिलारत्न पुरस्काराचे वितरण
नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटर रोडवरील माहेश्वरी भवन येथे सुप्रेम मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशनतर्फे कर्तबगार सुप्रेम महिलारत्न पुरस्काराचे वितरण चित्रपट अभिनेत्री पूर्वा शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा, व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, सचिव डॉ. सुशील पारख, दत्तराय देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पूर्वा शाह यांनी सांगितले की, महिलांना घरात, समाजात असंख्य आव्हानांना रोज सामोरे जावे लागते. त्यांना तोंड देण्याचे विशेष सामर्थ्य महिलांमध्ये असते. शरयू देशमुख (जीवनगौरव), मीरा नलावडे (सांस्कृतिक), चंद्रप्रभा केदारे (सामाजिक), शीतल बाविस्कर (अंगणवाडी), डॉ. स्वाती थेटे (शैक्षणिक), राजश्री गुंड (प्रशासकीय), सोनाली कदम (कृषी), डॉ. शीतल सुरकर (वैद्यकीय), रूपाली पवार (कला), पूनम भामरे (विशेष पुरस्कार) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
चित्रप्रदर्शनातून शिवाजी तुपे यांच्या स्मृतींना उजाळा
नाशिकच्या कलाविश्वाचा मानबिंदू आणि इंडियन मास्टर पेंटर अशी ख्याती असलेले ज्येष्ठ चित्रकार स्व. शिवाजी तुपे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या निधनानंतर बारा वर्षांनी त्यांच्या निवडक कलाकृतींचा एक अनोखा महाकुंभ नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला होता. या प्रदर्शनादरम्यान ज्येष्ठ चित्रकार गणपतराव माजगावकर आणि दत्तात्रय पाडेकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रदर्शनाचे औचित्य साधून मुक्ता बालिगा, आर्किटेक्ट संजय पाटील, अनिल तुपे आणि राहुल देशपांडे यांच्या पुढाकाराने नाशिकमध्ये हे विशेष प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात तुपे सरांच्या खजिन्यातील निवडक 45 कलाकृती आणि मुक्ता बालिगा यांच्या कलाकृती मांडण्यात आल्या होत्या.
Marathi New Year welcome processions boost Nashik residents’ enthusiasm…