भगवतीच्या भक्तांसाठी एसटी बस तत्पर

विभागीय अधिकारी क्षीरसागर : चैत्रोत्सवासाठी जादा बसेसचे नियोजन

वणी : प्रतिनिधी
राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सप्तशृंगी निवासिनी देवीच्या चैत्र यात्रोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात एसटी बसेस उपलब्ध केल्या आहेत. भगवती भक्तांच्या सेवेसाठी तत्पर आहोत, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी सचिन क्षीरसागर यांनी दिली.
साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून गणल्या जाणार्‍या सप्तशृंगी निवासिनी देवीचा चैत्रोेत्सव 25 एप्रिल ते 2 मेदरम्यान होणार असला, तरी रामनवमीला नाशिक येथील प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेऊन म्हणजेच गुरुवारपासून (दि.26) यात्रेस सुरुवात होणार आहे.नाशिक येथून सप्तशृंगगडावर जाण्यासाठी 50 एसटी बसेस उपलब्ध केल्या आहेत. नांदुरी ते सप्तशृंगगडावर जाण्यासाठी 150 बसेस सोडणार आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेता बससंख्या वाढविण्यात येणार असल्याचे कळवण आगारप्रमुख राहुल बोरसे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून गडासाठी एसटी बस उपलब्ध असेल, तसेच ही सेवा 24 तास असल्याचेही सांगण्यात आले आहे. नांदुरी व सप्तशृंगगडावर बसस्थानक तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, निवारा शेड, तसेच फिरते शौचालयांची व्यवस्था केली जाणार आहे. खान्देशचे माहेर असलेल्या देवीच्या चैत्रोत्सवासाठी धुळे विभागाने 150, जळगाव येथून 100 तसेच मालेगाव येथून 35 बसेस व मनमाड येथून 15 गाड्यांचे नियोजन केल्याची माहिती राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून देण्यात आली. यात्रोत्सव काळात खासगी वाहनांना गडावर मज्जाव करण्यात आला आहे. भाविकांच्या सुख-सुविधांसाठी नांदुरी, सप्तशृंगगड ग्रामपंचायत व विश्वस्त प्रयत्नशील आहेत.

ST buses ready for devotees of Bhagwati

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *