तयार माल, कच्चा माल व मशिनरी जळून लाखोंचे नुकसान
सिन्नर : प्रतिनिधी
मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील बोरोक्रीस कंपनीत सोमवारी (दि. 23) दुपारी साडेतीनच्या सुमारास आग लागून तयार माल, कच्चा माल आणि मशिनरी जळून खाक झाली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कंपनीत त्याचवेळी अग्निशमनचे मॉकड्रील सुरू असल्याने आग अर्ध्या तासात नियंत्रणात आणण्यात कंपनी प्रशासनाला यश आले. कर्मचारी प्रात्यक्षिकासाठी बाहेर असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक 104 वर बोरोक्रीस ही पेंट उत्पादक कंपन्यांना कच्चा माल पुरवणारी कंपनी आहे. सोमवारी दुपारी कंपनीत आग विझवण्याचे प्रात्यक्षिक (मॉकड्रील) सुरू होते. याचदरम्यान अचानक वीजपुरवठा खंडित झाला. काही वेळातच कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग विभागातून धूर निघत असल्याचे कर्मचार्यांच्या निदर्शनास आले.
रंगनिर्मितीसाठी वापरल्या जाणार्या रसायनांमुळे काही क्षणातच आग भडकली. मात्र, त्याचवेळी प्रात्यक्षिक सुरू असल्याने कंपनीतील अत्याधुनिक फायर फायटिंग यंत्रणेच्या सहाय्याने तत्काळ फोमचा मारा करण्यात आला. त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासात आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
दरम्यान, शेजारील कॅटा फार्मा, इंटरनिस फाइन केमिकल आणि त्र्यंबक रबर या कंपन्यांमधील अग्निशमन यंत्रणाही तातडीने कार्यान्वित करण्यात आली. सिन्नर नगरपालिकेचा एक आणि माळेगाव औद्योगिक वसाहतीतील दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले.
या आगीत तयार माल, कच्चा माल आणि मशिनरी जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कंपनीचे व्यवस्थापक प्रवीण शर्मा यांनी व्यक्त केला आहे. नेमक्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी उशिरापर्यंत पंचनामा व मोजदाद सुरू होती.
आगीची माहिती मिळताच स्टाईसचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी घटनास्थळी धाव घेत कर्मचार्यांसह मदतकार्य सुरू केले. मॉकड्रील सुरू असतानाच वीज खंडित झाली होती. त्यानंतर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यवस्थापक शर्मा यांनी व्यक्त केला.
Fire breaks out at Borocris company while mock drill is underway