अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून भारतात इंधनाच्या बाबतीत अनेक अफवा पसरल्या. आखातात युद्ध सुरू झाल्यानंतर जगभर इंधनाचा प्रश्न गंभीर झाला. ही वस्तुस्थिती आहे. यापासून भारत काही वेगळा नाही. स्वयंपाकी गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून सरकारने गॅस सिलिंडर्स वितरणावर आणि बुकिंगवर मर्यादा आणल्या. युद्ध सुरू झाल्यापासून पेट्रोल व डिझेलचा तुटवडा जाणवला नव्हता, आताही तसा जाणवत नाही. मात्र, पेट्रोलपंप बंद राहणार असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरवून देण्यात आल्याने मंगळवारी (दि. 24 मार्च) सायंकाळी व रात्री वाहनधारकांनी पेट्रोलपंपांवर मोठमोठ्या रांगा लावल्या. दुसर्या दिवशी सकाळीही रांगा होत्या. अफवांमुळे पेट्रोलपंपांवर गर्दी झाल्याचे पेट्रोल डीलर्सचे म्हणणे आहे. मात्र, पंपांना वेळेवर पुरवठा होत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या काही अडचणी असल्या, तरी उद्या-परवा पेट्रोल व डिझेल मिळणार नाही, असे समजून वाहनधारकांनी गर्दी केली. पेट्रोल व डिझेलचा भरपूर साठा असून, टंचाई नसल्याचा दावा पेट्रोलियम कंपन्यांनी करून अफवा फेटाळल्या. भारताकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पेट्रोल-डिझेल किंवा एलपीजीच्या तुटवड्याबाबतच्या अफवा कंपन्यांनी
फेटाळून लावल्या. देशातील सर्वांत मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल
कॉर्पोरेशनने यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली. पेट्रोल किंवा डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. ऑनलाइन पसरणार्या अफवांमुळे अनावश्यक चिंता निर्माण होऊ शकते आणि पुरवठ्याच्या सामान्य पद्धतींमध्ये अडचणी येऊ शकतात, असे या कंपनीने म्हटले. इंडियन ऑइलच्या विक्री केंद्राकडे पुरेसा साठा उपलब्ध असून, ती पूर्णपणे कार्यरत आहेत. त्यामुळे घाबरून खरेदी करणे टाळावे आणि फक्त योग्य माहितीवरच अवलंबून राहावे, असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले. अफवांमुळे अनावश्यक चिंता निर्माण होऊ शकते आणि पुरवठ्याच्या सामान्य पद्धतींमध्ये व्यत्यय येऊ शकतो, असेही या कंपनीने सूचित केले. भारत पेट्रोलियम
कॉर्पोरेशननेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशाच प्रकारचे एक निवेदन जारी केले. पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या अफवा पूर्णपणे निराधार असल्याचे कंपनीने म्हटले. भारताकडे इंधनाचा पुरेसा साठा असून, पुरवठा साखळी सामान्यपणे सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. देशभरात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही, अशी ग्वाही हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने निवेदनाद्वारे ग्राहकांना दिली. देशभरात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. इंधनाचा पुरवठा स्थिर असून, पुरेसा साठा उपलब्ध आहे. ग्राहकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये किंवा घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये, असा सल्ला देण्यात येत आहे. याचबरोबर, कृपया आपला इंधनाचा वापर नेहमीप्रमाणेच सुरू ठेवावा. आपल्या संपूर्ण नेटवर्कमध्ये इंधनाचा अखंड आणि सुरळीत पुरवठा
सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने म्हटले. पेट्रोल व डिझेलचा तसा तुटवडा नसला, तरी स्वयंपाकी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने यापूर्वी सिलिंडर्ससाठी गॅस एजन्सीजच्या ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या. सरकारने सिलिंडरची किंमत वाढविली. तसेच व्यावसायिक वापराच्या सिलिंडर्स वितरणावर मर्यादा आणली. सरकारने रेशनवर रॉकेल वितरण करण्याचे ठरविले आहे. तसेच कोळशाचा वापर करण्यावरही भर दिला. यावरून गॅसचा तुटवडा असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, गॅस सिलिंडरची मागणी आटोक्यात आणण्यासाठी सरकारने शहरी भागात 25 दिवसांनंतर बुकिंग आणि ग्रामीण भागात 45 दिवसांनी बुकिंग स्वीकारण्याचा नियम केला. हा निर्णय खरा आहे. दुसरीकडे गॅसचे वजन कमी करण्यात येणार असल्याची अफवा पसरली. सिलिंडरमध्ये 14 ऐवजी 10 किलो गॅस भरला जाईल, असे बोलले जात होते. परंतु, ही अफवा असल्याचे सरकारने स्पष्ट केले. यानंतर सिलिंडर बुकिंगचा कालावधी शहरात वाढविण्यात येणार असल्याची अफवा पसरली. सरकारने यावर खुलासा करून शहरात 25 दिवस व ग्रामीणमध्ये 45 दिवस कालावधी असल्याचे स्पष्ट केले. पश्चिम आशियातील युद्धामुळे इंधन आयातीला मर्यादा येत आहेत. त्यातच इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. यांवर सरकारने सावध पवित्रा घेतला असून, पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू केले आहेत. इराणने आपल्या मित्र देशांना हॉर्मुझ सामुद्रधुनीतून खनिज तेल व गॅस वाहतूक करणार्या जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला आहे. मित्र देशांमध्ये चीन, रशिया, भारत, पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या घाबरण्याचे कारण नाही. भारतात हॉर्मुझ सामुद्रधुनीतून तेल व गॅस येणार आहे; पण त्यासाठी उशीर लागू शकतो. त्यामुळे इंधन पुरवठा उशिराने होण्याची शक्यता असली, तरी घाबरून जाण्यासारखी सध्या परिस्थिती नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, हे सरकारचे म्हणणे बरोबर आहे. परंतु, अफवांचे पीक आणणार्या व सरकारने बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सोशल मीडियामुळे अफवा वार्याच्या वेगापेक्षा अधिक वेगाने पसरतात. त्यामुळे घबराट पसरते. याच घबराटीमुळे पेट्रोलपंप व गॅस एजन्सीजवर लोक गर्दी करतात. सोशल मीडियाच नव्हे, तर मुख्य प्रवाहातील ऑनलाइन मीडियाही अफवा पसरविण्यात असतो, हेही लक्षात घेतले पाहिजे. युद्धात ब्रेकिंग न्यूजना तोटा नाही. खातरजमा न करता बातम्यांचा रतीब घातला जातो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर वापरकर्त्यांना धरबंध नाही. युद्धा सुरू झाल्यापासून भारतात फारशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आले नाहीत. फक्त प्रीमियम पेट्रोलच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. पण सोशल मीडियाने अफवांच्या माध्यमातून दर वाढवून लोकांमध्ये घबराट निर्माण केली. त्यातच आता पेट्रोल आणि डिझेल संपल्याच्या अफवा पसरू लागल्याने पेट्रोलपंपांवरच्या रांगाही वाढू लागल्या. हे मंगळवारी दिसून आले. महिनाभरात पेट्रोल आणि डिझेल या पुरवठ्यावर आणि त्याच्या विक्रीवर कोणताही परिणाम झाला नव्हता. अपवादात्मक परिस्थितीत एखाददुसरा पेट्रोलपंप बंद पडला असेलही. मात्र, गेल्या दोन दिवसांत आता पेट्रोलची प्रचंड टंचाई अशा प्रकारच्या अफवाही पसरू लागल्या. युद्धाच्या परिस्थितीमध्ये भविष्यकाळात काहीही होऊ शकते, या भीतीने सर्वसामान्य नागरिक नेहमीच साठवणूक करण्याचा प्रयत्न करतो. स्वयंपाकाचा गॅस असो की, पेट्रोल-डिझेल असो, त्यांची साठवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढला होता. नेहमीच्या सर्वसाधारण मागणीपेक्षा अनेक पट मागणी या कालावधीमध्ये वाढली होती. त्याचा परिणाम थेटपणे इंधन पुरवठा साखळीवर होणे अपरिहार्य होते. पसरवल्या जाणार्या अफवा आणि युद्ध परिस्थिती लक्षात घेता सरकारने दररोज इंधन साठा व पुरवठ्याविषयी ताजी व अद्ययावत माहिती दिली पाहिजे. पेट्रोल व डिझेलचे दर दररोज जाहीर केले जातात. त्याप्रमाणे पेट्रोल, डिझेल व गॅसचा साठा व पुरवठा याची माहिती दिली, तर अफवांना आळा बसेल आणि लोकांमध्ये घबराट निर्माण होणार नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्धाविषयी उलटसुलट विधाने करत असतात. त्यांच्या विधानांचा अर्थ आपल्या परीने काढून मीडिया आणि सोशल मीडियातून विश्लेषण केले जाते. त्यामुळे अफवाही पसरतात. तण माजल्यासारखे अफवांचे पीक येणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजेच. पण, मुख्य प्रवाहातील ऑनलाइन मीडियाने जबाबदारीने काम केले पाहिजे. सोशल मीडियाचा वापर नागरिकांनी तितक्याच जबाबदारीने केला पाहिजे. अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, ही सर्वांचीच जबाबदारी आहे.
A crop of rumours