रणरणत्या उन्हातही भाविकांची अखंड पदयात्रा; मालेगाव शहर भक्तिमय
♦ तापमान चाळीस अंशांच्या आसपास.
♦ रणरणत्या उन्हातही भाविकांची गर्दी.
भाविकांच्या सेवेसाठी विविध मंडळांचा पुढाकार
भाविकांच्या सेवेसाठी शहरातील नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध मंडळांनी पुढाकार घेतला आहे. चाळीसगाव फाटा ते आघार बुद्रुक परिसरापर्यंत ठिकठिकाणी सेवा केंद्र उभारण्यात आले आहे. थंड पाणी, सरबत, ताक, तसेच पोहे, वडापाव, चहा आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय मदतीसाठीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गुरुदत्त मंडळाने यंदाही महाप्रसादाची परंपरा कायम ठेवली असून, गॅसटंचाईमुळे चुलीवर पुरी-भाजी, मसालेभात आणि बुंदी तयार करून भाविकांना भोजन दिले जात आहे. तब्बल 33 वर्षांची ही सेवा आजही तितक्याच निष्ठेने सुरू आहे. विशेष म्हणजे, मुस्लिम बांधवांनीही थंड पाणी व सरबत वाटप करून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला आहे.
पोलीस प्रशासनातर्फे कडक सुरक्षा
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षाव्यवस्था केली आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 44 अधिकारी व 378 पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. राज्य राखीव पोलीस दलाचीही मदत घेण्यात आली आहे. गस्त वाढवून वातावरण सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. प्रखर उन्हाचा सामना करत श्रद्धा, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा संगम या पदयात्रेत पाहायला मिळत आहे. ‘अंबिके येऊ दे गडावरी’ ही आर्त हाक खान्देशभर दुमदुमत आहे.
Let Ambika come to the fort!