मनमाड बाजार समितीच्या भूखंडांचे श्रीखंड लाटण्याचा डाव

माजी सभापती दीपक गोगड यांचा गंभीर आरोप

मनमाड : प्रतिनिधी
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ताधार्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप बाजार समितीचे माजी सभापती दीपक गोगड आणि त्यांच्या सहकार्‍यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. बाजार समितीच्या मोकळ्या जागांचे नियमबाह्य वाटप करून भूखंडांचे श्रीखंड लाटण्याचा हा डाव असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बाजार समितीचे सभापती माजी आमदार संजय पवार हे हितसंबंध जोपासण्यासाठी नियमबाह्य कामे करून बाजार समितीच्या मोकळ्या जागा वाटप करत आहे. याबाबत पणन संचालक, पुणे व इतर संबंधित विभागाकडे तक्रारी दाखल केल्याचे गोगड यांनी पत्रकात म्हटले आहे.
गोगड यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार सन 2023 मध्ये बाजार समितीची निवडणूक झाल्यापासून सत्ताधारी नेत्यांनी राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी समितीच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप सुरू केला आहे. चुकीच्या पद्धतीने सत्ता मिळवून बाजार समितीच्या हितापेक्षा स्वतःच्या स्वार्थाला प्राधान्य दिले जात असून विद्यमान सभापती माजी आमदार संजय पवार आपल्या पदाचा गैरवापर करून बाजार समितीचे मोकळे भूखंड आपल्या हितसंबंधी व्यक्तींना वाटप करत आहे.
मुळात बाजार समितीच्या लिलावसाठीच जागा अपुरी पडते. मात्र सचिवांना हाताशी धरून नियमबाह्य जागा वाटपाचा धडाका पवार यांनी लावला आहे. याबाबत पणन संचालक व इतर संबंधित विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. यावर चौकशी समिती बसवण्यात यावी व दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गोगड व इतर संचालकांनी केली आहे.

न्यायालयीन लढाईचा इशारा

या प्रकरणाची तक्रार जिल्हा उपनिबंधक, नाशिक आणि पणन संचालक, पुणे यांच्याकडे केली आहे. जर यावर तत्काळ कारवाई झाली नाही, तर शासनस्तरावर आणि न्यायालयीन प्रक्रियेद्वारे दाद मागितली जाईल, असा इशारा पत्रकाद्वारे दिला आहे. ज्या संस्था किंवा व्यक्तींना या जागा वितरित केल्या जाणार आहेत, त्यांची नावे लवकरच पुराव्यासह जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रसिद्धिपत्रकावर माजी सभापती दीपक गोगड, उपसभापती पुंजाराम आहेर, संचालक गणेश धात्रक, योगेश कदम आणि आनंदा मार्कंड यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

भूखंड वाटपात अनियमितता

सवार्ंत गंभीर आरोप बाजार समितीच्या मोकळ्या जागांच्या वाटपाबाबत केला आहे. “बाजार समितीच्या मालकीच्या मौल्यवान जागांचे भाडेपट्ट्याने वितरण आणि करारनामे करून भूखंडांचे श्रीखंड लाटण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत,“ असे पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे. या गैरप्रकारात केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर काही प्रशासकीय अधिकारी (सहकार खात्यातील) सामील असल्याचा आरोप गोगड यांनी केला आहे. मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त न देणे आणि चांदवड रोडवरील बेकायदेशीर गाळ्यांच्या जागा वितरित करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत, बाजार समिती संपवण्याचा हा घाट असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

Manmad Market Committee plots to be looted by the Shrikhand

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *