श्रद्धेचा मुखवटा अन् अंधश्रद्धेचा खेळ

अलीकडच्या काळात समोर आलेल्या काही घटनांनी समाजाच्या विवेकबुद्धीला आणि नैतिकतेला थेट प्रश्न विचारला आहे. कॅप्टन खरात प्रकरण, नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित समोर आलेला आक्षेपार्ह व्हिडिओ, तसेच एका कीर्तनकाराने अनेक वर्षे अल्पवयीन मुलीचे केलेले लैंगिक शोषण- या सर्व घटना वेगवेगळ्या क्षेत्रांत घडल्या असल्या तरी त्यामागचा समान धागा अत्यंत चिंताजनक आहे. तो म्हणजे अंधश्रद्धेचा अतिरेक, व्यक्तिपूजेची विकृत मानसिकता आणि विवेक हरवलेला समाज. या घटना केवळ व्यक्तींच्या चुकीपुरत्या मर्यादित नाहीत; त्या आपल्या सामाजिक संरचनेतील खोलवर रुजलेल्या त्रुटींचं प्रतिबिंब आहेत. आजचा माणूस विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण या सगळ्यांत प्रगती करत असताना त्याच वेळी मानसिक आणि भावनिक पातळीवर तो अधिक असुरक्षित होत चाललेला दिसतो. जीवनातील ताणतणाव, अस्थिरता, स्पर्धा, आर्थिक आणि वैयक्तिक संकटं यामुळे अनेकांना एक आधार हवा असतो- कोणीतरी जो सगळं ठीक करेल अशी खात्री देईल. या गरजेतूनच भोंदूबाबांचा भाव वाढतो. ते स्वतःला देवाचा दूत, चमत्कार करणारा, भवितव्य सांगणारा म्हणून सादर करतात आणि लोक त्यांच्या प्रभावाखाली येतात.
परंतु इथे सर्वांत वेदनादायक बाब म्हणजे, लोक या व्यक्तींवर इतका विश्वास ठेवतात की, जितका ते स्वतःच्या आई-वडिलांवर, जवळच्या नात्यांवरही ठेवत नाहीत. घरातले लोक काही सांगितले तर शंका घेतली जाते, पण एखाद्या बाबाने सांगितलेली गोष्ट अंतिम सत्य मानली जाते. हा विरोधाभास केवळ अज्ञानामुळे नाही, तर भावनिक तुटलेपणामुळेही आहे. आज अनेक कुटुंबांमध्ये संवादाचा अभाव आहे. मुलं आणि पालक यांच्यातील नातं केवळ औपचारिक राहिलं आहे. अशा वेळी बाहेरचा एखादा व्यक्ती तुम्हाला समजून घेतो असा भास निर्माण करतो आणि माणूस त्याच्याकडे ओढला जातो. यामध्ये सामाजिक घटकांचाही मोठा वाटा आहे. आपल्या समाजात परंपरा, धर्म आणि श्रद्धा यांना खूप महत्त्व आहे, जे योग्यच आहे. परंतु जेव्हा ही श्रद्धा विचारशून्य बनते, तेव्हा ती अंधश्रद्धेत रूपांतरित होते. सगळे जातात, म्हणजे ते बरोबरच असेल या मानसिकतेमुळे लोक स्वतः काहीही विचार करत नाहीत. एखाद्या बाबाच्या आश्रमात हजारो लोक जातात, मोठमोठ्या गाड्या दिसतात, प्रचार-प्रसार केला जातो आणि या सगळ्यामुळे त्या व्यक्तीची विश्वासार्हता वाढल्यासारखी वाटते. पण प्रत्यक्षात तो केवळ एक भास असतो.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा अत्यंत सूक्ष्म असली तरी ती ओळखणं आवश्यक आहे. श्रद्धा माणसाला नैतिकता, संयम, सहकार्य आणि सकारात्मकता शिकवते. ती व्यक्तीला अधिक चांगला माणूस बनवते. पण अंधश्रद्धा माणसाला गुलाम बनवते. ती प्रश्न विचारण्याची क्षमता हिरावून घेते, भीती निर्माण करते आणि व्यक्तीला पूर्णपणे दुसर्‍या व्यक्तीच्या नियंत्रणाखाली आणते. जेव्हा एखादा बाबा स्वतःला देवाचा अवतार म्हणतो, प्रश्न विचारणार्‍यांना दूर ठेवतो, आर्थिक आणि वैयक्तिक नियंत्रण ठेवतो, तेव्हा ते स्पष्टपणे अंधश्रद्धेचंच लक्षण आहे.
या पार्श्वभूमीवर वैज्ञानिक विचारसरणीचं महत्त्व अधिक अधोरेखित होतं. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे केवळ प्रयोगशाळेतले प्रयोग नव्हेत, तर प्रत्येक गोष्टीकडे तर्काने पाहण्याची वृत्ती आहे. हे का घडतंय?, यामागे पुरावा काय आहे?, हे लॉजिकल आहे का? असे प्रश्न विचारणं ही वैज्ञानिक मानसिकता आहे. जर समाजातील प्रत्येक व्यक्तीने ही सवय अंगीकारली, तर कोणत्याही भोंदू व्यक्तीला लोकांना सहज फसवणं शक्य होणार नाही. तथापि, केवळ व्यक्तीची जबाबदारी नाही; समाज आणि व्यवस्थेचीही भूमिका महत्त्वाची आहे. अशा प्रकरणांमध्ये कायद्याची कठोर अंमलबजावणी होणं अत्यावश्यक आहे. अनेक वेळा असे लोक वर्षानुवर्षे चुकीची कृत्यं करत राहतात, पण त्यांच्यावर वेळेवर कारवाई होत नाही. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि अधिक लोक त्यांच्या जाळ्यात अडकतात. जलद आणि कठोर शिक्षा ही केवळ न्यायासाठीच नव्हे, तर समाजाला योग्य संदेश देण्यासाठीही आवश्यक आहे.
शिक्षण व्यवस्थेतही आज बदल करण्याची गरज आहे. केवळ पुस्तकातील ज्ञान न देता मुलांना विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि तर्क लावण्याची सवय शालेय जीवनापासूनच लावली पाहिजे. घरातही मुलांना हे करू नको, कारण मी सांगतो असं न सांगता हे का करू नये हे समजावून सांगितलं पाहिजे. संवाद वाढवला पाहिजे, जेणेकरून मुलांना घर सोडून बाहेर आधार शोधण्याची गरज भासणार नाही.
याहूनही अधिक चिंताजनक बाब म्हणजे या घटनांकडे पाहण्याची समाजाची मानसिकता. अशा गंभीर प्रकरणांमध्ये आवाज उठवणे, पीडितांच्या बाजूने उभे राहणे आणि यातून काही शिकणे अपेक्षित असताना, अनेक जण केवळ ते आक्षेपार्ह व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र आज समाजात दिसते. ही उत्सुकता केवळ कुतूहल नसून, ती एका विकृत मानसिकतेचे द्योतक आहे. एखाद्या चुकीच्या कृत्याचा निषेध करण्याऐवजी त्यात मनोरंजन शोधणारा समाज हा स्वतःच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उभं करतो.
वाईट पाहण्याची भूक, वाईट करणार्‍यांइतकीच धोकादायक असते. अशा वेळी आपल्याला स्वतःलाच विचारावे लागते – आपण खरोखर त्या भोंदू कॅप्टन खरातपेक्षा वेगळे आणि चांगल्या मानसिकतेचे आहोत का? कारण चुकी करणारा एक असतो, पण ती चूक पाहूनही गप्प बसणारे किंवा त्यातून विकृत आनंद घेणारे अनेक असतात. त्यामुळेच समाज म्हणून आपण केवळ दोषारोप करणारे न राहता, आत्मपरीक्षण करणारे होण्याची गरज आहे. शेवटी एक गोष्ट स्पष्ट होते की, समस्या बाहेर नाही, ती आपल्या आत आहे. जोपर्यंत आपण विचार न करता कोणावरही विश्वास ठेवू, तोपर्यंत असे प्रकार घडतच राहणार. देवावर श्रद्धा ठेवणं चुकीचं नाही, पण ती श्रद्धा विवेकाच्या चौकटीत असली पाहिजे. माणुसकी, नैतिकता आणि तर्क यापेक्षा मोठं काहीही असू शकत नाही. आज गरज आहे ती स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याची. आपण आपल्या मुलांना काय शिकवतोय? की आपणच मुलांना घोटभर तीर्थ पाजून परीक्षेत चांगले मार्क्स मिळण्याची वाट बघतोय? खरंतर आपण स्वतः किती विचार करून निर्णय घेतो? आपण कोणाचं अनुकरण करतोय आणि का? या प्रश्नांची उत्तरं आजच शोधली, तरच समाज बदलू शकतो. कारण शेवटी, अंधश्रद्धा ही केवळ एका बाबाची किंवा एका घटनेची समस्या नाही, ती एक मानसिकता आहे अन् कोणतीही मानसिकता बदलायची असेल, तर तिची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते. ज्या दिवशी समाज प्रेक्षक न राहता प्रश्न विचारणारा बनेल, त्या दिवशीच भोंदूगिरीचा अंत होऊ शकेल.. अन्यथा या घटना पुढेही अविरत घडत राहतील…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *